ठाणे ग्रामीण कार्यक्षेत्रात स्वतंत्र वाहतूक विभागासाठी ‘अखिल भारतीय ब्राह्मण महासंघा’ची मागणी

डंपर अपघाताने दिला इशारा

कल्याण  : भरधाव डंपरच्या धडकेने नुकतेच टिटवाळा हादरले आणि शहरातील वाहतूक व्यवस्थेतील त्रुटी पुन्हा एकदा ठळकपणे समोर आल्या. वाढती जड वाहनांची वर्दळ, अपुरे नियंत्रण आणि मनुष्यबळाची कमतरता यामुळे अपघातांचा धोका वाढत असल्याची भावना नागरिकांत तीव्र झाली आहे. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, टिटवाळा शहर यांच्यावतीने ॲड. जितेंद्र जोशी यांनी स्वतंत्र वाहतूक विभाग स्थापन करण्याची ठाम आणि व्यापक मागणी केली आहे.

नुकत्याच झालेल्या डंपर अपघातात वाहनांचे नुकसान होऊन वाहतूक कोंडी निर्माण झाली. या घटनेने केवळ टिटवाळ्यातीलच नव्हे तर संपूर्ण ठाणे ग्रामीण परिसरातील वाहतूक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. वाढत्या शहरीकरणामुळे आणि जड वाहनांच्या सततच्या रहदारीमुळे प्रभावी व समर्पित वाहतूक शाखेची आवश्यकता प्रकर्षाने जाणवत आहे.

महत्वाचे म्हणजे, ही मागणी केवळ टिटवाळा किंवा कल्याण तालुका पोलीस ठाण्यापुरती मर्यादित नसून, ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय व त्याअंतर्गत येणाऱ्या सर्व पोलीस ठाण्यांसाठी स्वतंत्र वाहतूक विभाग स्थापन करण्याची आहे. सध्या उपलब्ध पोलीस यंत्रणेवर कायदा-सुव्यवस्था आणि वाहतूक नियंत्रण या दोन्ही जबाबदाऱ्या असल्याने कार्यक्षमतेवर परिणाम होत असल्याचे मत व्यक्त होत आहे.

या मागणीचा पाठपुरावा करत ॲड. जोशी यांनी  पोलीस महासंचालक, महाराष्ट्र यांची सुनियोजित भेट मिळावी यासाठी अधिकृत अर्ज सादर केला आहे. भेट निश्चित झाल्यानंतर ठाणे ग्रामीण कार्यक्षेत्रासाठी स्वतंत्र वाहतूक शाखा, आवश्यक मनुष्यबळ, विशेष पथके आणि जड वाहनांवर कठोर नियंत्रण यासाठी ते प्रखरपणे भूमिका मांडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *