ठाणे महानगर पालिकेच्या महासभेत व्यासपीठ सोडून भाजपाचे उपमहापौर मैदानात

नवी मुंबईत भाजपाच्या महापौरांना शिवसेना नगरसेवकांचा घेराव, केला सभात्याग

स्वाती घोसाळकर

ठाणे : राज्यात आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाले असून महायुतीतील भाजापा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना विधानसभेत मजबूतीने विरोधकांचा मुकाबला करण्यासाठी सज्ज झाली असतानाच इकडे ठाणे आणि नवी मुंबई महानगर पालिकेत मात्र नेमके उलट चित्र पहायला मिळाले. ठाणे महानगर पालिकेच्या महासभेत व्यासपीठ सोडून भाजपाचे उपमहापौर शिंदेंच्या शिवसेनेच्या महापौरांच्या निर्णयाविरोधात मैदानात उतरल्याने एकच खळबळ माजली तर नवी मुंबईत भाजपाच्या महापौरांच्या एकतर्फी निर्णयाच्या विरोधात शिंदेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी महापौरांना घेराव घातला आणि सभात्यागही केला. एकुणच या दोन्ही घटनामुळे राज्यात दोन्ही पक्षात फारसे आलबेल नसल्याची जोरदार चर्चा होती. कारण मुंबई महानगर पालिकेत ठाकरेंची शिवसेना आणि भाजपा यांची संयुक्त आघाडी असताना भाजपाने अशी टोकाची आक्रमक भूमिका घेतल्याची नोंद नसल्याकडेही जाणकारांनी यावेळी लक्ष वेधले
ठाणे महापालिकेच्या पहिल्याच महासभेत प्रश्नोत्तरांना बगल देत थेट विषयपत्रिका पटलावर ठेवल्याने सभागृहात भाजपा आणि शरद पवारांच्या नगरसेवकांनी एकच गोंधळ घातला. भाजप आणि शिवसेनेमध्ये जोरदार खडाजंगी झाली. भाजपाचे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी तर व्यासपीठावरून खाली उतरून सत्ताधारी शिवसेनेला जाब विचारला. तरीही प्रशासनाने कामकाज रेटुन महासभा गुंडाळली.

दरम्यान, ठाणे महापालिकेच्या पहील्याच महासभेला कलंक लागल्याच्या घोषणा भर सभेतच भाजपच्या नगरसेवकांनी दिल्याने राजकीय चर्चांना ऊत आला आहे

तर उपमहापौरपदाचा राजीमान

देईन – कृष्णा पाटील

भाजप नगरसेवकांनी आज आक्रमक पवित्रा घेत आधी ४ वर्षाचा लेखाजोखा देण्याची मागणी केली. ठाणेकर नागरिकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्या प्रश्नाची उत्तरे भाजपच्या नगरसेवकांनी मागितली. तसेच भाजप नगरसेवकांनी मांडलेली लक्षवेधी प्रशासनाने वाचून दाखवावी अशी मागणी केली. मात्र, महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी सर्व समित्या गठीत झाल्यानंतर सर्व प्रश्न उत्तरे आणि लक्षवेधी घेण्यात येईल, असे सांगत विषयपत्रिका घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार महापालिका सचिव मनीष जोशी यांनी विषय पत्रिकेवरील सर्व विषय झटपट वाचून दाखवल्याने सत्ताधारी शिवसेनेने चर्चेविनाच तात्काळ मंजुरी दिली. यावर पुढील सभेत बोलू दिले नाही, तर उपमहापौर पदाचा राजीनामा देईल, असा गर्भित इशारा यावेळी कृष्णा पाटील यांनी दिला आहे.

परिवहन समिती सदस्य निवडीवरून

नवीमुंबई महासभेत संघर्ष

तौलनिक संख्याबळाच्या बळावर सदस्य न निवडल्यामुळे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने नवी मुंबई महानगर पालिकेच्या महासभेत तीव्र निषेध नोंदविला. यामुळे सभागृह तहकूब करण्यात आले.

नवी मुंबई महानगर पालिका परिवहन समितीवर १२ सदस्य निवडीचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. सभागृहनेते सागर नाईक यांनी तौलनिक संख्याबळाऐवजी मतदानाद्वारे सदस्य निवडीचा मुद्दा मांडला. विरोधीपक्षनेते विजय चौगुले,  शिवराम पाटील,  किशोर पाटकर यांनी या प्रक्रियेला आक्षेप घेतले. यानंतर ही सत्ताधारी भाजपने परिवहन सदस्यपदासाठी नावं सुचविण्यास सुरूवात केल्याने शिंदेसेनेने महापौरांचा निषेध केला.
शिंदेसेनेने महापौरांसमोर उभं राहून निषेध केला. यानंतर भाजपा नगरसेवकांनी महापौरांसमोर केला. गोंधळामुळे सभा तहकूब करण्यात आली. सभा पुन्हा सुरू झाल्यानंतर भाजपाने बहुमताच्या बळावर १२ सदस्यांची निवड केली. विरोधकांचा एकही सदस्य न घेतल्यामुळे शिंदेसेनेच्या नगरसेवकांनी सभात्याग केला.

फोटो ओळ १

ठाण्यात उपमहापौरांचीच महपौरांविरोधात घोषणाबाजी

फोटो ओळ १

नवी मुंबईत भाजपाविरोधात शिवसेना नगरसेवक आक्रमक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *