मुंबई : अजित पवारांना श्रद्धांजली वाहताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाकवी भास यांच्या ‘स्वप्नवासवदत्तम्’ या नाटकातील सुभाषिताचा उल्लेख केला. “लाकूड जळते तेव्हा अग्नी फक्त शरीर जाळतो; पण मित्रशोक हृदय आणि अंतस्थ आत्म्यालाही जाळतो. अजितदादांच्या निधनाने हीच वेळ माझ्यावर आली आहे. हा केवळ राजकीय नुकसान नाही, तर अंत:करणाला वेदना देणारी घटना आहे.” अशा शब्दात फडणवीसांनी शब्दसुमन अर्पित केले.
“आज बोलणं कुठून सुरू करावं असा प्रश्न पडतो आहे. मनात प्रचंड वादळ आहे. अधिवेशनात सहज नजर वळली की बाजूला दादा दिसायचे. सकाळपासून रात्रीपर्यंत कितीही उशीर झाला तरी ते आपल्या जागेवर असायचे. आज ती खुर्ची रिकामी आहे, ही खंत असह्य आहे,” असे मुख्यमंत्री म्हणाले.
फडणवीस यांनी सांगितले की, यंदा अजित पवार यांनी बारावा अर्थसंकल्प मांडला असता आणि पुढील वर्षी तेरावा अर्थसंकल्प सादर करून विक्रमाच्या उंबरठ्यावर पोहोचले असते. “अचानक त्यांच्या जाण्याने अर्थसंकल्प मांडण्याची जबाबदारी माझ्यावर आली,” असे त्यांनी नमूद केले.
अजितदादांच्या कार्यशैलीचा उल्लेख करताना फडणवीस म्हणाले, “कठोर निर्णय घ्यायचे असतील तर मागेपुढे न पाहणारे ते होते. वित्त विभागाने ‘लाडकी बहीण’ योजनेच्या आर्थिक भाराबाबत पुनर्विचार सुचवला तेव्हाही त्यांनी ठाम भूमिका घेत मंत्रिमंडळात विषय मांडला होता.”
राजकीय पोकळीच्या संदर्भात मुख्यमंत्री म्हणाले, “आपण अनेकदा पोकळी निर्माण झाली असे म्हणतो. पण अजितदादांसारखा नेता, ज्याने स्वतःचे नेतृत्व निर्माण केले, अनेक क्षेत्रे पादाक्रांत केली, असा व्यक्ती निघून जातो तेव्हा पोकळी म्हणजे काय, याची खरी जाणीव होते.” असे फडणवीस म्हणाले.
