‘यादव जी की लव्ह स्टोरी’ चित्रपटाविरोधात मोर्चाचा इशारा
रमेश औताडे
मुंबई :मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत महाराष्ट्र करणी सेनाचे प्रमुख अजय सिंह सेंगर यांनी ‘यादव जी की लव्ह स्टोरी’ या हिंदी चित्रपटाविरोधात २७ फेब्रुवारी रोजी सेन्सॉर बोर्डावर मोर्चा काढण्याचा इशारा मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला. या वेळी राज्य प्रवक्ते शैलेश पन्नालाल यादव, सुभाष चंद्र यादव, किरण सोनवणे, अंबिका प्रसाद यादव आदी उपस्थित होते. चित्रपटात यादव समाजाचे व भगवान श्रीकृष्ण यांचे चुकीचे चित्रण करण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी या चित्रपटामुळे हिंदू धर्म व यादव समाजाच्या भावना दुखावल्याचे सांगितले.
संबंधित चित्रपटाच्या निर्माता संदीप तोमर, दिग्दर्शक अंकित भडना, अभिनेत्री प्रगती तिवारी व अभिनेता विशाल मोहन यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. २७ फेब्रुवारी रोजी विविध हिंदू संघटनांच्या सहभागातून सेन्सॉर बोर्डावर मोर्चा काढण्यात येणार असून राज्यात हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा देण्यात आला. सरकारने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून चित्रपटावर कारवाई करावी, अशी मागणी संघटनेतर्फे करण्यात आली.
