मालमत्ता कर वसुलीच्या कामातील हलगर्जीपणासाठी दोन लिपिकांवर निलंबनाची कारवाई
कल्याण: मालमत्ता कर वसुलीच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या ९ आय प्रभागातील दोन लिपिकांवर कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी निलंबनाची कडक कारवाई केली. मालमत्ता कर वसुलीच्या उददीष्टपुर्तीसाठी कर संकलन विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यामार्फत अथक प्रयत्न करण्यात येत आहेत. आज आयुक्त अभिनव गोयल यांनी कर वसुलीसंदर्भात समक्ष महानगरपालिकेच्या ९ आय व १० इ प्रभागात भेट दिली आणि दोन्ही प्रभागांचे सहायक आयुक्त, कर अधिक्षक व कर विभागातील भाग लिपिक यांच्या समवेत कर वसुलीबाबत सविस्तर बैठक घेवून, वसुलीच्या सद्यस्थितीबाबत एकंदर आढावा घेतला. या बैठकीत भाग लिपिकांशी चर्चेअंती अत्यंत कमी प्रमाणात कर वसुलीस जबाबदार असणा-या ९ आय प्रभागातील भाग लिपिक अरविंद काळण व राजेंद्र पाटील यांच्यावर कामातील हलगर्जीपणाबाबत तातडीने निलंबनाची कारवाई करत, कर वसुलीचे उद्दिष्टपूर्तीसाठी अधिक गांभीर्याने काम करण्याबाबत अधिकारी व कर्मचारी वर्गास सक्त निर्देश दिले.
यावेळी, कर वसुलीसाठी प्रभागात पहाणी करीत असताना कर लावण्यास अटकाव करणा-या सुमारे ४ अनधिकृत अनिवासी मालमत्तावर निष्कासनाची धडक कारवाई देखिल करण्यात आली. मार्च महिना हा कर संकलनाचा या आर्थिक वर्षातील शेवटचा महिना असून, कर चुकवेगिरी करणा-यांवर तसेच कर वसुलीच्या कामात जाणीवपुर्वक निष्काळजीपणा दाखविणा-या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर देखिल कडक कारवाई केली जाईल अशी माहिती अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांनी दिली आहे. यावेळी अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे, कर विभागाचे उपआयुक्त बाळासाहेब चव्हाण उपस्थित होते.
