कल्याण पश्चिमेतील गोविंद वाडी परिसराची महापौर हर्षाली चौधरी यांनी केली पहाणी
नागरिकांशी साधला थेट संवाद
कल्याण : कल्याण पश्चिमेतील गोविंद वाडी परिसराची केडीएमसी महापौर हर्षाली चौधरी यांनी स्वतः पायी फिरून पहाणी केली आणि तेथील रहिवाशी असलेल्या मुस्लिम बांधवांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यांनी यावेळी सदर परिसरातील स्वच्छतेची पाहणी केली. गोविंद वाडी परिसरात ड्रेनेजचे पाणी तुंबत असल्याबाबत पालिका सदस्या समीना शेख यांनी केलेल्या तक्रारीवरून तेथील मलनिस्सारण व्यवस्थेची देखील त्यांनी पाहणी केली आणि सदर तक्रारीचे निराकरण करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. यावेळी महापालिका सचिव किशोर शेळके, उपायुक्त रामदास कोकरे, मलनिस्सारण विभागाचे कार्यकारी अभियंता प्रसाद सखदेव, काँग्रेस पक्षाच्या गटनेत्या कांचन कुलकर्णी त्यांच्या समवेत उपस्थित होत्या. यावेळी नवनिर्वाचित महापौरांचा सत्कार करण्यासाठी नागरिक पुढे सरसावले असता आधी तुमची कामे होऊ द्यात, नंतर सत्कार करा असे सांगत महापौरांनी आपल्या सहृदयतेने नागरिकांची मने जिंकली.
