विसाव्या शतकाच्या सुरुवातीला आणि त्याअगोदर घरातील कामे घरचे पुरुष आणि महिला मंडळी करीत असत. केवळ काही कामासाठीच मोलाने काम करून घेतले जात असे. परंतु जगभरात विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा डंका वाजू लागला आणि एकेका नव्या संशोधनातून माणसाने आपले काम सोपे करून घेतले. काही कामे यंत्रे करू लागली. यंत्रांमध्ये नंतरच्या काळात स्वयंचलित यंत्रणा आल्या आणि १९५४ साली जगातला पहिला रोबो तयार झाला. १९२८ साली देखील एक मानवी रोबो तयार केला गेला होता अशी माहिती मिळते. त्याचे नाव होते ‘एरिक’ आणि जनक होते डब्ल्यू एच रिचर्डस. रोबोचे आराखडे तर लिओनार्डो दा विन्ची यांनीही इसवीसन १४९५ मध्ये तयार केले होते. दोन पायांचा मानवी रोबो २००४ मध्ये आला आणि २००५ मध्ये हुबो नावाचा चालणारा रोबोही तयार झाला. अगदी अलीकडे म्हणजे नोव्हेंबर २०२५ मध्ये ए२ नावाच्या रोबोने ३ दिवसात १०० किलोमीटर्स चालून गिनेस जागतिक विक्रम सुद्धा केला.
स्वत:च्या मनाने स्वयंपाक करू शकेल असे रोबो ही कल्पना उत्तम वाटत असतानाच असा रोबो बाजारात उपलब्ध झाला आहे. ग्राहकांना उपयुक्त असा हा रोबो घरगुती जीवनच बदलेल असे मानले जाते. हा रोबो साडेपाच फूट उंच आणि ३० किलो वजनाचा असून तो घरातील कपड्यांना घडी घालणे, डिशवॉशरमध्ये भांडी लावणे अशी कामे करू शकतो. एक अडचण अशी की याला सांभाळण्यासाठी आभासी हेल्मेट घातलेला एक कर्मचारी लागतो. तो या रोबोवर नजर ठेवून असतो.
वेगवेगळी कामे करणारे असे मानवी रोबो आता बाजारात येऊ लागणार आहेत. आणि त्या प्रत्येकाची कमीअधिक किंमत २ लाख रुपयांच्या आसपास असेल. माणसाच्या शरीराशी जवळीक साधणारे असे रोबो कधीतरी घरासाठीही विकत घेतले जातील अशी पूर्वी केवळ कल्पना होती पण जागतिक पातळीवर आज किमान ५० कंपन्या असे रोबो निर्माण करीत आहेत. त्यातच आता एआय या तंत्राची भर पडल्यामुळे उत्पादक आणि ग्राहक या दोघांचीही अशा रोबोवर नजर आहे.
मात्र रोबो प्रत्यक्ष आणि मोठ्या प्रमाणावर लोकांच्या घरात शिरेल त्यापूर्वी माणसाची घरे त्याच्यासाठी किती सोयीस्कर आहेत याचाही विचार करावा लागेल. त्याला काम करण्यासाठी लागणारी जागा आपल्या आगपेटीच्या डबीसारख्या घरात कुठे असेल हेही बघावे लागेल. रोबोला आधी माणूस समजावून घ्यावा लागेल. त्याला आपली भाषा कळायला आणि समजायला एक पीढी जावी लागेल.
मात्र मानवी रोबोचे काही फायदेही असू शकतात. एक म्हणजे ही यंत्रे आहेत. त्यामुळे यांना इतक्यातच नोकरीचे नियम लागू करता येणार नाहीत. काही कामे त्यांच्यासाठी नेमून देताना त्यांचा घरातील वावर इतर कोणत्या प्रश्नांना जन्म देणार हे आताच सांगता यायचे नाही. रोबो हा आज मानवी असला तरी त्याला मानवाचे रूप आणि गुण येण्यासाठी आणि तो परिपूर्ण होण्यासाठी अजून किमान २० वर्षे वाट बघावी लागणार आहे. तोवर माणूसही किती बदलला असेल हेही तपासावे लागेल. तेव्हा हात मिळवण्यासाठी हातघाईवर येऊ नका…धीर धरा…

श्याम तारे

प्रसन्न फीचर्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *