डाटामॅटिक्स, सेंट्रल बँकेची विजयी घोडदौड
इन्श्युरन्स शील्ड टी-२० क्रिकेट स्पर्धा
मुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशनची मान्यता असलेल्या इन्श्युरन्स शील्ड टी-२० क्रिकेट स्पर्धेत डाटामॅटिक्स संघाने बँक ऑफ महाराष्ट्र वर तर सेंट्रल बँकेने यजमान ओरिएंटल इन्श्युरन्स संघावर विजय मिळवला. डाटामॅटिक्स संघाने बँक ऑफ महाराष्ट्राचा ९ विकेट्स शिल्लक राखून धुव्वा उडवला. प्रथम फलंदाजी करताना बँक ऑफ महाराष्ट्राला ९२ धावांपर्यंतच मजल मारता आली. रोहिदास कोयंडे आणि कल्पेश सावंत यांनी बँक ऑफ महाराष्ट्राच्या फलंदाजांना मैदानावर स्थिरावण्याची कोणतीही संधी दिली नाही. कल्पेश सावंतने १४ धावांत ४ तर रोहिदास कोयंडेने १३ धावांत ३ बळी मिळवले. त्यानंतर डाटामॅटिक्स संघाने ९.३ षटकांतच ९२ धावांचे आव्हान पार केले. भुवन पाटील याने ३० चेंडूंत केलेली ५० धावांची तर उपेंद्र यादवने २५ चेंडूंत केलेली ३६ धावांची खेळी डाटामॅटिक्सच्या विजयात महत्त्वपूर्ण ठरली.
एलिट गटाच्या दुसऱ्या सामन्यात सेंट्रल बँकेने ओरिएंटल इन्श्युरन्सवर २५ धावांनी विजय मिळवला. सेंट्रल बँकेने प्रथम फलंदाजी करताना १५८ धावा उभारल्या. प्रथम परमार याने तडाखेबंद ५८ धावांची खेळी साकारली. त्याला उत्तम साथ देताना गौतम साठेने २३ चेंडूंत ३६ धावांचे योगदान दिले. हे उद्दिष्ट गाठताना ओरिएंटल इन्श्युरन्सच्या फलंदाजांनी ६० धावांची सलामी दिली. मात्र त्यानंतरच्या फलंदाजांना कामगिरीत सातत्य राखता आले नाही, परिणामी धावांची गती कमी झाल्याने त्यांना विजयासाठी २५ धावा कमी पडल्या. ओरिएंटलचा डावखुरा फलंदाज समीप मिसाळ याने ३१ चेंडूंत नाबाद ४१ धावा तर शंतनु तांडाले याने ४० धावा करत चांगला प्रतिकार केला. मात्र विजयासाठी त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. राजेश बोरकर याने दोन बळी मिळवत सेंट्रल बँकेच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. आता उपांत्यपूर्व फेरीचे सामने ६ मार्च रोजी खेळवण्यात येतील.
