आपल्या मलमली आवाजाने गझल गायकीला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारे संगीत रसिकांचे आवडते गझल गायक पंकज उधास यांचा आज दुसरा स्मृतिदिन. दोन वर्षापूर्वी २६ फेब्रुवारी २०२४ रोजी पंकज उधास यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने संगीत विश्वातील एक तारा निखळून पडला. पंकज उधास हे भारतातीलच नाही तर जगातील एक प्रमुख गझल गायक म्हणून ओळखले जात होते. १९८६ साली आलेल्या नाम चित्रपटातील त्यांनी गायलेल्या चिठ्ठी आई है…. आई है…या गाण्याने ते घराघरात पोहचले. हे गाणे आजही तितकेच लोकप्रिय आहे. नाम चित्रपट यशस्वी होण्यात या गाण्याचा खूप मोठा वाटा होता. या गाण्यांनंतर त्यांनी हिंदी चित्रपटात अनेक गाणी गायली. घायल, साजन, ये दिल्लगी, फिर तेरी कहाणी याद आई, मोहरा यासारख्या चित्रपटातून त्यांनी गाणी गायली. त्यांनी गायलेले ना कजरे की धार, आज फिर तुमपे प्यार आता है, जिये तो जीये कैसे, और आहिस्ता अशी कितीतरी गाणी लोकप्रिय झाली व ही सर्व गाणी गाजली ती त्या गाण्यातील अर्थपूर्ण शब्दांनी आणि पंकज उधास यांच्या मधुर आवाजाने. चित्रपटातील त्यांनी गायलेले गाणी लोकप्रिय झाली तरी त्यांची ओळख ही गझल गायक म्हणूनच राहिली. त्यांचे मोठे बंधू मनहर उधास हे देखील प्रख्यात गझल गायक आहेत त्यांनीच पंकज उधास यांना पहिल्यांदा स्टेजवर गझल गाण्याची संधी दिली. १९७१ साली त्यांनी कर्मा या चित्रपटात पहिल्यांदा पार्श्वगायन केले मात्र त्यांची दखल कोणी घेतली नाही त्यामुळे ते कॅनडाला निघून गेले. तिथे त्यांनी छोट्या मोठ्या समारंभात गाण्यास सुरुवात केली. तिथे ते स्टेज शो देखील करू लागले. त्यांचे स्टेज शो ही लोकप्रिय होऊ लागले. भारतात परतल्यावर त्यांनी अनेक स्टेज शो केले मात्र चित्रपटात त्यांना म्हणावी तशी संधी मिळत नव्हती कारण तो जमाना मोहंमद रफी आणि किशोर कुमार यांचा होता. १९७९ साली त्यांना जवाब या चित्रपटातील मितवा रे मितवा… हे गाणे गाण्याची संधी मिळाली या संधीचे त्यांनी सोने केले. हे गाणे लोकप्रिय झाल्यावर त्यांनी गझल क्षेत्रात करियर करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान त्यांनी अनेक गझल गायली. पंकज उधास यांनी एक से बढकर एक गझल गात रसिकांना मंत्रमुग्ध केले. १९८० साली त्यांच्या गाण्याचा पहिला अल्बम आला. त्यानंतर त्यांच्या गाण्यांचा धडाका सुरू झाला. १९८१ साली मुकर्रर, १९८२ साली तरनुम, १९८३ साली महाफिल, १९८५ साली नायाब हे त्यांचे अल्बम आले. या अल्बम मधील सर्व गाणी रसिकांना आवडली. त्यांच्या गझला इतक्या लोकप्रिय झाल्या की रसिकांनी त्यांना गझल सम्राट ही पदवी दिली. सारं काही विसरायला लावणाऱ्या त्यांच्या गझला आजही रसिक गुणगुणताना दिसतात. त्यांनी आपल्या आवाजाने गझल क्षेत्राला आणि गझल गायकीला ऊर्जितावस्था मिळवून दिली. गझल गायकी लोकप्रिय करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. गझल गायन आणि संगीत क्षेत्रात त्यांनी भरीव योगदान दिले. त्यांच्या याच योगदानासाठी भारत सरकारने त्यांना पद्मश्री हा मानाचा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. त्यांच्या निधनाने संगीत आणि गायन क्षेत्राची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे. गझल सम्राट पंकज उधास यांना दुसऱ्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५
श्याम ठाणेदार
