कल्याण मुरबाड रोडवर नव्याने उभारलेल्या पोलमुळे अपघाताची शक्यता
कल्याण : कल्याण मुरबाड राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या अगदी कडेला वरप तलावा जवळ रस्त्यात लाईट पोल उभारण्यात आले आहेत. या पोलमुळे वाहनांना धडकण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. विशेषतः रात्री व हाय-स्पीड वाहतुकीदरम्यान अपघाताची शक्यता वाढते. आयआरसी सुरक्षा मानकांनुसार आवश्यक सेफ्टी अंतर व संरक्षण व्यवस्था दिसून येत नाही. याबाबत सामाजिक कार्यकर्ते निकेश पावशे यांनी तहसीलदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पत्रव्यवहार करत याकडे लक्ष वेधले आहे.
कांबा, वरप, म्हारळ ग्रामपंचायत या तिन्ही ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूस धूळ आणि कचरा असून फुटपाथ नाहीत. लोकांना अशा समस्या असताना एमएसईबीचे अतिक्रमण चालू आहे. दोन दिवसांपूर्वी येथे मोठा अपघात झाला असताना सुद्धा प्रशासन जागे झाले नसून आणखी खत पाणी घालत आहे. त्यामुळे या पोल उभारणीची परवानगी व तांत्रिक मंजुरी तपासावी, सेफ्टी ऑडिट करून सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक सुधारणा कराव्यात. यामध्ये नियमभंग असल्यास तात्काळ कारवाई करण्याची मागणी सामजिक कार्यकर्ते निकेश पावशे यांनी केली आहे.
