लाभले आम्हास चे रचयिते सुरेश भट यांची जयंती मराठी भाषा अभिमान दिन म्हणून साजरी करा ;
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी यांची शासनाकडे मागणी
मुंबई : ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित थोर साहित्यिक, कवी विष्णु वामन शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त आपण मराठी भाषा गौरव दिवस म्हणून साजरा करतो त्याचप्रमाणे लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी चे रचयिते कविवर्य सुरेश भट यांची १५ एप्रिल रोजी येणारी जयंती ही मराठी भाषा अभिमान दिवस म्हणून साजरी करण्यात यावी अशी कळकळीची मागणी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक श्री योगेश वसंत त्रिवेदी यांनी आज बोरीवली पूर्व येथील सुविद्या शिक्षण प्रसारक संघाच्या मंगुभाई दत्ताणी विद्यालयात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना केली. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षक उल्हास वडोदकर, तसेच प्राचार्या डॉ सुनिता कामटे, जयंत निकम, संतोष इंदुले, अतुल काते आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. जागतिक मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात नेहमीच एक गल्लत होते. जयंती कुसुमाग्रजांची आणि कविता म्हणतात सुरेश भट यांची. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे तीन दिवस वेगवेगळ्या दिवशी साजरे करण्यात येतात. यासंदर्भात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी सांगितले की तीनच काय ३६५ दिवस उत्सव साजरा करा, काय हरकत आहे आनंदोत्सव साजरा करायला. तद्वतच मराठी भाषेचा गौरव रोज का करु नये ? कुसुमाग्रजांच्या कविता २७ फेब्रुवारी रोजी म्हणा आणि लाभले भाग्य आम्हास बोलतो मराठी गात गात १५ एप्रिल रोजी सुरेश भट यांची जयंती साजरी करा. महाराष्ट्र शासनाने हा निर्णय जाहीर करावा अशी माझी कळकळीची मागणी आहे, असेही योगेश वसंत त्रिवेदी यांनी सांगितले.
ज्ञानेश्वरा बरोबरच विज्ञानेश्वरही व्हा! शिक्षणतज्ज्ञ उल्हास वडोदकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विज्ञानाचे महत्त्व पटवून सांगितले की, आपण विज्ञानाची कास धरली आणि प्रगती करा आणि ज्ञानेश्वरा बरोबरच विज्ञानेश्वरही व्हा. विज्ञानाला चमत्कार मान्य नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी बनविलेल्या विविध प्रकारच्या शास्त्रीय प्रयोगांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन तसेच दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्राचार्या डॉ सुनिता कामटे यांनी स्वागत प्रास्ताविक केले. मराठी भाषा माहिती श्री सुधीर अंबात यांनी, स्वागत गीत, विज्ञान गीताचे समूहगायन श्रीमती रीना पिंपळे आणि श्रीमती सुनेत्रा तांबे यांनी, विज्ञान प्रदर्शन संयोजन श्री श्यामकांत पाटील यांनी, जयंत निकम यांनी आभारप्रदर्शन तर वीणा वनमाळी यांनी सूत्रसंचालन केले. विद्यार्थिनींनी केलेल्या पसायदान गीताने मराठी भाषा गौरव दिनाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *