भावी पोलिसांची रस्त्यावरील परवड थांबवा – प्रताप सरनाईक
मिरा-भाईंदर- ‘राज्याच्या सुरक्षेची धुरा भविष्यात ज्यांच्या खांद्यावर असणार आहे, त्या तरुण उमेदवारांना आज मिरा-भाईंदरमध्ये उघड्यावर रात्र काढावी लागणे, ही प्रशासनासाठी अत्यंत लज्जास्पद बाब आहे,’ अशा कठोर शब्दांत महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्हा पालकमंत्री आणि स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांनी प्रशासकीय ढिसाळ कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. मिरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात त्यांनी पोलीस भरतीसाठी आलेल्या हजारो युवक-युवतींच्या निवासाची आणि मूलभूत सुविधांची तत्काळ व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत.
पोलीस आयुक्त आणि महानगरपालिका आयुक्त यांच्यात नियोजनाचा अभाव असल्याने ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली असल्याचा ठपका पत्रात ठेवण्यात आला आहे. सोबतच मिरा-भाईंदर महानगरपालिकेची सभागृहे, एमएमआरडीए (MMRDA) आणि बीएसयूपी (BSUP) अंतर्गत असलेल्या रिक्त सदनिका पोलीस भारती देण्यासाठी आलेल्या उमेदवारांसाठी तात्काळ खुल्या कराव्यात, अशी सूचना देखील आयुक्तांना करण्यात आली आहे. प्रशासकीय दिरंगाई होत असतानाच, उमेदवारांच्या भोजनाची संपूर्ण जबाबदारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक स्वतः आणि त्यांच्या शिवसेना संघटनेच्या वतीने स्वीकारली असल्याचे हि या पत्रात नमूद करण्यात आलेले आहे.यासंपूर्ण प्रकरणाबद्दल बोलताना मंत्री प्रताप सरनाईक म्हणतात कि, ‘दोन-दोन दिवस उन्हातानात तग धरून हे तरुण आपल्या भविष्याची परीक्षा देत आहेत. जे उद्या कायदा व सुव्यवस्था राखणार आहेत, त्यांनाच आज सुरक्षित आसरा न मिळणे हे वेदनादायी आहे. प्रशासनाने संवेदनशीलता दाखवून यावर ठोस उपाययोजना कराव्यात, अन्यथा ही अनास्था खपवून घेतली जाणार नाही. तसेच भविष्यातील भरती प्रक्रियेसाठी कायमस्वरूपी ‘समन्वय आराखडा’ तयार करावा”
प्रशासनाने या विषयाचे गांभीर्य ओळखून सकारात्मक पावले न उचलल्यास, उमेदवारांच्या हक्कासाठी अधिक आक्रमक भूमिका घेण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.
