नागपूर: नागपरूमधील राऊळगाव जवळील ‘एवनीरा’ परिसरातल्या एस.बी.एल. एनर्जी लिमिटेड या दारुगोळा बनवणऱ्या डिटोनेटर कंपनीत रविवारी सकाळी भीषण साखळी स्फोट झाले. यात १७ कामगारांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये १४ महिलांसह ३ पुरुष कामगारांचा समावेश आहे. १८ कामगार गंभीर जखमी झाले आहेत.
जखमींपैकी १८ जणांना ऑरेंजसिटी रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनेकजण ५० टक्क्यांच्या वर भाजले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भिती व्यक्त होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे मृतांमध्ये बहुतांश महिलांचा समावेश आहे.
रविवारी सकाळी ७ ते ८:३० च्या सुमारास कंपनीच्या ‘१६-बी’ आणि ‘२०-बी’ नॉनल क्रिम्पलिंग युनिटमध्ये एकामागून एक शक्तिशाली स्फोट झाले. घटना घडली त्यावेळी युनिटमध्ये ३६ कामगार उपस्थित होते. स्फोटांची तीव्रता इतकी भयानक होती की, त्याचा आवाज कित्येक किलोमीटरपर्यंत ऐकू आला. कारखाना परिसरात धुराचे लोट पसरले आणि सर्वत्र रक्तामांसाचा सडा पडला होता. सकाळी दुपारी १२ पर्यंत ढिगाऱ्याखालून १७ कामगारांचे पूर्णपणे जळालेले मृतदेह बाहेर काढण्यात आले.
