कोलकाता – संजू सॅमसनच्या झंझावती हातोडा खेळीपुढे वेस्टइंडिजची टी२० वर्ल्डकपच्या सुपर ८ मध्ये अक्षरशा धुळधाण उडाली. संजू सॅमसनच्या आक्रमक ९७ धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिजवर पाच गडी राखून महत्त्वपूर्ण विजय मिळवत टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. ‘करो या मरो’ अशा स्थितीत झालेल्या सुपर ८ या सामन्यात सॅमसन नावच्या या झंझावातने विंडीजच्या विजयाच्या आशेवर जणू हातोडाच मारला. आणि चार चेंडू शिल्लक ठेवत भारताला १९६ धावांचे आव्हान पार करून दिले. भारताचा सामना आता बुधवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर इंग्लंडविरुद्ध होईल.
प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने चार गडी गमावून १९५ धावांची मजल मारली. सुरुवातीला शाय होपने ३२ धावांची खेळी करत डावाला स्थैर्य दिले, तर रोस्टन चेसने ४० धावा करत मधल्या फळीत धावफलक हलता ठेवला. भारताच्या गोलंदाजांनी मधल्या षटकांत धावांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र अखेरच्या टप्प्यात जेसन होल्डर आणि रोव्हमन पॉवेल यांनी आक्रमक फलंदाजीचा आवेश चढवला. होल्डरने नाबाद ३७, तर पॉवेलने नाबाद ३४ धावा ठोकत धावफलक १९५ पर्यंत नेला.
भारताकडून जसप्रीत बुमराहने नेहमीप्रमाणे अचूक आणि धारदार मारा करत ३६ धावांत दोन महत्त्वाचे बळी घेतले. त्याच्या अचूक यॉर्कर्स आणि बदलत्या गतीच्या चेंडूंमुळे वेस्ट इंडिजची धावगती काही काळ रोखली गेली. अन्य गोलंदाजांनीही साथ दिली, मात्र शेवटच्या षटकांतील फटकेबाजीमुळे लक्ष्य आव्हानात्मक बनले.
१९६ धावांच्या पाठलागात भारताची सुरुवात सावध झाली. अभिषेक शर्मा आणि इशान किशन फास्ट खेळण्याच्या नादात लवकर बाद झाले. मात्र एकदा संजू सॅमसनला लय सापडताच सामन्याचे चित्र पालटले. त्याने ५० चेंडूत नाबाद ९७ धावांची अप्रतिम खेळी करत १२ चौकार आणि ४ षटकारांची आतषबाजी केली. कव्हर ड्राइव्ह, पुल आणि सरळ षटकार अशा विविध फटक्यांनी त्याने प्रेक्षकांची मने जिंकली. विशेष म्हणजे, दडपणाच्या क्षणी त्याने संयम राखत शेवटपर्यंत नाबाद राहून संघाला विजय रेषा पार करून दिली.
तिलक वर्माने २७ धावा करत सॅमसनला भक्कम साथ दिली. सूर्यकुमार यादव (१८) आणि हार्दिक पांड्या (१७) यांनीही छोटेखानी पण उपयुक्त खेळी करत धावांचा प्रवाह कायम ठेवला. शेवटच्या टप्प्यात आवश्यक धावगती वाढली असली तरी सॅमसनच्या आत्मविश्वासपूर्ण फटक्यांमुळे भारताने चार चेंडू राखून सामना आपल्या नावावर केला.
वेस्ट इंडिजकडून जेसन होल्डर (२/३८) आणि शमार जोसेफ (२/४२) यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. मात्र सॅमसनच्या निर्धारासमोर त्यांचे प्रयत्न अपुरे पडले.
