आखाती तणावाच्या काळात दुबईतील ‘मुंबई एक्सप्रेस’चा मदतीचा हात
अडकलेल्या भारतीयांसाठी दिवसभर मोफत जेवण
मुंबई : आखाती प्रदेशातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर दुबईतील मुंबईमूळ असलेल्या उपाहारगृहाने अडकलेल्या भारतीय नागरिक आणि पर्यटकांसाठी दिलासा देणारा उपक्रम सुरू केला आहे. दुबईतील करामा परिसरात कार्यरत असलेल्या मुंबई एक्सप्रेस रेस्टॉरंट अँड कॅफे या उपाहारगृहाकडून प्रवासात अडथळे निर्माण झालेल्या महाराष्ट्रासह देशभरातील भारतीयांसाठी मोफत नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचे जेवण उपलब्ध करून देण्यात येत आहे. या उपक्रमाबाबत बोलताना भाजप आमदार मिहिर कोटेचा यांनी सांगितले की, हा प्रयत्न राष्ट्रीय एकात्मतेचे आणि सामाजिक बांधिलकीचे प्रतीक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली दुबईतील स्थानिक टीमशी समन्वय साधून तातडीने ही व्यवस्था करण्यात आली आहे.
“संकटाच्या काळात आपल्या लोकांचा सन्मान राखत सेवा करणे हीच खरी देशसेवा आहे. जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असलेला प्रत्येक भारतीय आपला आहे. दुबईत अडकलेला एकही महाराष्ट्रीयन किंवा भारतीय उपाशी राहू नये, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे आमदार मिहीर कोटेचा यांनी स्पष्ट केले. उपाहारगृहातील नोटीसमध्ये, “दुबईत अडकलात? आम्ही तुमच्यासोबत आहोत,” असा संदेश देण्यात आला आहे. दररोज सकाळी नाश्त्यासाठी इडली-सांबार, दुपारी पुलाव आणि रात्री फ्राईड राईस अशी जेवणाची सोय मोफत उपलब्ध आहे. उपाहारगृह सकाळी ८ ते रात्री १ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.
हे उपाहारगृह बी-१०, दुकान क्रमांक ५ व ६, शेख हमदान कॉलनी, करामा, दुबई येथे आहे. गरजू नागरिकांनी थेट उपाहारगृहाशी संपर्क साधावा किंवा +९७१ ४ ३७० ८०८१ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
