समाजातील वाईट प्रवृत्तींचे दहन
पिसवलीतील जीआरसी हिंदी शाळेत उत्साहात होळी साजरी
कल्याण : समाजातील वाईट, खोटेपणा आणि अहंकार यांचे प्रतीकात्मक दहन करून होळी साजरी करण्याचा संदेश देत कल्याण पूर्वेतील पिसवली येथे होळी दहनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. समाज उद्धार समिती संचालित श्रीमती जीआरसी हिन्दी हाय स्कूल आणि ओम साई इंग्लिश स्कूल यांच्या परिसरात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारीवर्ग यांनी एकत्र येत आनंदी वातावरणात होळी साजरी केली. शाळा व्यवस्थापनाने होळी दहनाच्या माध्यमातून समाजातील वाईट प्रवृत्तींचे उच्चाटन करण्याचा संदेश दिला.
कार्यक्रमाचे आयोजक डॉ. जे. पी. शुक्ला यांनी आपल्या मनोगतात सांगितले, “आपण समाजात प्रचलित असलेले वाईट, अप्रामाणिकता, खोटेपणा आणि अहंकार यांची होळी जाळली आहे. वाईटाचा सामना करण्यासाठी आपण अहंकाराचा त्याग केला पाहिजे.” ते पुढे म्हणाले की, आज केवळ समाजातच नव्हे तर जगभरात अहंकाराची भावना वाढली असून त्यामुळे अनेक ठिकाणी युद्धजन्य परिस्थिती निर्माण होत आहे. ही परिस्थिती टाळण्यासाठी प्रेम, स्नेह आणि सहकार्याची भावना जोपासणे आवश्यक आहे.
होलिका दहनानंतर विद्यार्थी व शिक्षकांनी एकमेकांना रंग लावून होळीच्या शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी प्राचार्य पुष्पा जे. पी. शुक्ला, करण पाल, सीमा पाठक, वर्षा पाटील, नीतू सिंग उपस्थित होते. प्राचार्य पुष्पा शुक्ला यांनी सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
