वहाँ दिया जला दू, जहाँ अंधेरा है या भूमिकेतून स्थापन झालेल्या जविकिरण काव्य मैफल मिरा रोड येथे संपन्न
मिरा – भाईंदर : जविकिरण काव्य मैफल आणि स्वरसंगम फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मीरा रोड येथील विरंगुळा केंद्र सभागृहात एका काव्य मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ गझलकार कवी सुनील ओवाळ होते. ज्येष्ठ हिंदी साहित्यिक कवी हृदयेश मयंक, ज्येष्ठ गझलकार भागवत बनसोडे, सद्धम्मकार प्रा. आनंद देवडेकर, कवी प्रा. डॉ. अनिल साबळे, कवयित्री प्रांजली काळबेंडे, गझलकार मुस्तहसन अज्म, कवी डॉ. मुक्तार खान, कवयित्री प्रा. संध्या वैद्य यांच्यासह ज्यांच्या नावातील जवि या आद्याक्षरांवरून ही संकल्पना सुचली ते मराठीतील ज्येष्ठ आंबेडकरवादी कवी ज.वि.पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ही मैफल संपन्न झाली. सुप्रसिद्ध निवेदक आणि जविकिरण काव्य मैफलीचे चिटणीस प्रा.उत्तम भगत यांनी सूत्रसंचालन केले. या संमेलनात एकूण ३२ कवींनी आपल्या रचना सादर केल्या. यावेळी प्रा. संध्या वैद्य यांच्या आव्हान व प्रा. भीमराव पेटकर यांच्या आयुष्याच्या वळणावर या कविता संग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
सिने-नाट्य सृष्टीतील हरहुन्नरी कलाकार अशोक चाफे यांनी केलेल्या आभारप्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्वरमाउली फाउंडेशन व जविकिरण काव्य मैफल पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाला मिरा भाईंदर परिसरातील श्रोत्यांची उपस्थिती लाभली.
