एकनाथ शिंदेंकडून आमदार मंदा म्हात्रे यांच्या तब्बेतीची व्हिडिओ कॉलद्वारे विचारपूस
अनिल ठाणेकर
ठाणे, बेलापूर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मंदा म्हात्रे यांना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीची माहिती घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे त्यांची विचारपूस केली.
मंदा म्हात्रे यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे मंदा म्हात्रे यांच्याशी संवाद साधत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी त्यांनी त्यांना धीर देत, “आपण तब्येतीची पूर्ण काळजी घ्या. मतदारसंघातील जनतेचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत. आपण लवकर बरे होऊन पुन्हा जनसेवेसाठी कार्यरत व्हाल,” असे सांगितले. या घटनेनंतर बेलापूर मतदारसंघातील नागरिक आणि कार्यकर्त्यांमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत असून त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना केली जात आहे. मंदा म्हात्रे या बेलापूर मतदारसंघातील सक्रिय आणि जनतेशी सातत्याने संपर्क ठेवणाऱ्या नेतृत्व म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या प्रकृतीबाबतची बातमी समजताच अनेकांनी त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
