२०२७ पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर करण्याचे उद्दिष्ट-गणेश नाईक
अनिल ठाणेकर
ठाणे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पातून राज्याच्या सर्वांगीण विकासाला गती देण्याचा निर्धार व्यक्त केला असून, २०२७ पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, अशशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली.
या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांवर विशेष भर देण्यात आला असून, गायमुख ते फाऊंटन दरम्यान भुयारी मार्ग उभारण्यात येणार आहे. तसेच पेण येथे “तिसरी मुंबई” विकसित करण्यात येणार असून, या प्रकल्पातून सुमारे १२ लाख रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे. ऊर्जा क्षेत्रात प्रत्येक जिल्ह्यात MSEM केंद्र उभारण्यात येणार असून, यामुळे सुमारे ५० लाख लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. पर्यावरण संवर्धनासाठी राज्य सरकारने ३०० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या ‘एक पेड मा के नाम’ या अभियानालाही चालना देण्यात येणार आहे.पालघर येथे आशिया खंडातील दहावे सर्वात मोठे बंदर उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवण्यात येणार असल्याची माहितीही गणेश नाईक यांनी दिली. भारतीय जनता पार्टीचे ठाणे जिल्हा संपर्क मंत्री तथा वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले की, हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना आधार देणारा, आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेतीला गती देणारा आणि महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे नेणारा आहे.गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात आली आहे. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अॅग्रीस्टॅक, महावेध, क्रॉपसॅप, महाडीबीटी यांसारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून शेती क्षेत्र अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात आला आहे.“मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना” सुरूच राहणार असून, यासाठी सुमारे २० हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. “मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०” अंतर्गत १६ हजार मेगावॅट ऊर्जा निर्मिती होऊन १००% कृषी पंपांना दिवसा वीजपुरवठा केला जाणार आहे.राज्यातील जलसंपत्तीचे व्यवस्थापन मजबूत करण्यासाठी विविध नदीजोड प्रकल्प राबवले जाणार आहेत. वैनगंगा-नळगंगा, दमणगंगा-वैतरणा-गोदावरी, नार-पार-गिरणा आणि दमणगंगा-एकदरे-गोदावरी या प्रकल्पांसाठी हजारो कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूरनियंत्रणासाठी जागतिक बँकेच्या मदतीने प्रकल्प राबवण्यात येणार आहे. राज्यातील मेट्रो नेटवर्क १२०० किमीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई ते नवी मुंबई विमानतळ मेट्रो, वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया मेट्रो-११, तसेच पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी देण्यात आली आहे. विविध द्रुतगती मार्ग, उन्नत मार्ग आणि ग्रीनफिल्ड महामार्गांच्या माध्यमातून वाहतूक अधिक सुलभ व वेगवान होणार आहे.“महाराष्ट्र अमृतकाल रस्ते विकास योजना” अंतर्गत हजारो किलोमीटर रस्त्यांचे जाळे उभारले जाणार असून, ग्रामीण भागातील रस्ते आणि संपर्क व्यवस्था अधिक मजबूत केली जाणार आहे. प्रधानमंत्री ग्रामसडक योजना आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजना यांच्याद्वारे दुर्गम भागांना जोडण्यावर भर दिला जाणार आहे.या सर्व उपक्रमांमुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होऊन विकासाला गती मिळेल, असा विश्वास गणेश नाईक यांनी व्यक्त केला.
