हिंदू नव वर्ष शोभायात्रेतून संस्कृती जतन आणि प्रसाराचा प्रामाणिक प्रयत्न

मुंबई :  गुढीपाडव्याच्या दिवशी काढण्यात येणारी हिंदु नववर्ष शोभायात्रा ही केवळ मिरवणूक नसून आपल्या संस्कृतीचे जतन आणि प्रसार करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. आपल्या परंपरा, वेशभूषा, वाद्ये आणि गुढी उभारण्याची परंपरा समाजासमोर जिवंत ठेवण्याचे हे माध्यम ठरले, अशा शब्दांत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ महादेव रानडे यांनी वायंगणकर साई स्पोर्ट्स क्लब चे राकेश गजानन वायंगणकर यांचा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या परिश्रमाचा गौरव केला.

जेष्ठ पत्रकार कै. विजय वैद्य आणि कर्ममूर्ती श्री महादेव रानडे यांच्या प्रेरणेतून उभी राहिलेली ही शोभायात्रा समाजातील एकात्मता आणि बंधुभाव वृद्धिंगत करणारी ठरली. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत एकतेचा सुंदर संदेश दिला.  लेझीम, ढोल, लाठीकाठी, बाईक रॅलीमुळे शिस्त व संघभावना वृद्धिंगत झाली. किंबहुना ती तरुण पिढीला योग्य दिशा देणारी ठरली.

बोरीवली पूर्व येथील वायंगणकर साई स्पोर्ट्सच्या सौ. पल्लवी राकेश वायंगणकर,  रुचिता व  हर्षिता वायंगणकर यांच्या नियोजनातून ही भव्य दिव्य शोभायात्रा निघाली. या स्पोर्ट्स क्लब तर्फे लाठीकाठीचे मोफत प्रशिक्षण दिले जात असताना मुलांचे मनगट आणि हृदय देव, देश आणि धर्मासाठी प्रखर व्हावे हेच ध्येय समोर ठेवण्यात येते. शंखनाद, ढोल-ताशे आणि भगव्या ध्वजांनी परिसर दुमदुमला. अजय गजानन वायंगणकर व पूजा अजय वायंगणकर यांच्या शंखनादाने संपूर्ण वातावरण भारावून गेले.

सुविद्या प्रसारक संघाचे मंगुभाई दत्ताणी हायस्कूल  येथील विद्यार्थी, ढोल-ताशा व लेझीम पथकांनी कार्यक्रमाला विशेष रंगत आणली. मुख्याध्यापिका सुनिता कामटे तसेच सर्व शिक्षकवृंद आणि विनोद जाधव यांचे योगदान यासाठी मोलाचे ठरले. स्थानिक महिला, संस्था, मंडळे आणि ओम साई सेवा मंडळ यांच्या सहभागामुळे कार्यक्रम अधिक भव्य दिव्य झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *