कल्याण – कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत २७ गावातील द्वारली येथे बेकायदा इमारत उभारणाऱ्या तीन भूमाफियांच्या विरूध्द आय प्रभागाच्या अधीक्षकांनी वरिष्ठांच्या आदेशावरून महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना कायद्याने (एमआरटीपी) कलमाने तक्रार केली आहे. हिल लाईन पोलिसांनी तीन भूमाफियांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
कल्याण पूर्वेतील द्वारली गावातील भगवान मारूती भोईर, सुचिता मारूती भोईर, सौरभ भोईर यांच्या विरूध्द हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी कल्याण डोंबिवली पालिकेच्या नगररचना विभागाच्या आवश्यक बांधकाम परवानग्या न घेता, शासकीय परवानग्या न घेता तळ आणि दोन मजल्याचे बेकायदा इमारतीचे बांधकाम केले आहे.
या बेकायदा बांधकाम प्रकरणी पालिका वरिष्ठांच्या आदेशावरून आय प्रभागाचे साहाय्यक आयुक्त चंद्रकांत जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक राजेंद्र साळुंखे यांनी हा गुन्हा भूमाफियांवर दाखल केला आहे. पिसवली येथील एका हिंदी शाळेच्या बेकायदा बांधकाम प्रकरणी अधीक्षक साळुंखे यांनी नुकताच एक एमआरटीपीचा गुन्हा शाळा चालकाविरूध्द दाखल केला आहे. आता त्यांनी दाखल केलेला हा दुसरा गुन्हा आहे.
गेल्या वर्षी द्वारली गावात गुन्हा दाखल भगवान भोईर, सौरभ भोईर यांनी एक बेकायदा इमारतीचे बांधकाम सुरू केले असल्याच्या तक्रारी पालिकेच्या आय प्रभागात दाखल झाल्या होत्या. या तक्रारींची पडताळणी तत्कालीन पालिका अधिकाऱ्यांनी केली. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये तत्कालीन आय प्रभाग साहाय्यक आयुक्तांनी भोईर कुटुंबीयांना बांधकामाची बांधकाम परवानगी, जमीन मालकी हक्काची आणि इतर शासकीय परवानग्यांची कागदपत्रे सादर करण्यास सांगितले. सदर सुनावणीला भगवान भोईर आणि इतर हजर राहिले नाहीत. त्यानंतर तात्काळ पालिकेच्या आय प्रभागाने भोईर यांचे बांधकाम महाराष्ट्र महापालिका अधिनियम ४७८अन्वये अनधिकृत घोषित केले. आणि हे बांधकाम तात्काळ तोडून घेण्याचे निर्देश दिले होते.
