शासनाचे ऑनलाइन व्यवहारामुळे, सुरक्षित असणारी तिजोरी उघड्यावर
राजीव चंदने
मुरबाड :सध्याचे संगणकीय युगात शासनाची सर्व देवाण घेवाण हि ऑनलाईन पद्धतीने होत असल्याने एकेकाळी प्रत्येक कार्यालयात. सुरक्षित असणाऱ्या तिजोरीची देखभाल करण्यासाठी कार्यालयात चौकीदाराचे पद असायचे.परंतु मुरबाड तालुक्यातील सामाजिक वनीकरण विभागाची तीच तिजोरी आज उघड्यावर पडलेली दिसुन येत असल्याने तिची विल्हेवाट लावणार कशी हा सर्वसामान्य नागरिकाला प्रश्न पडला आहे.
शासनाचे प्रत्येक कार्यालयाला येणाऱ्या अनुदानाची रोख रक्कम बॅकेत न ठेवता ती लोखंडी आणि अवजड तिजोरीत ठेवली जात असे.तिच्या चाव्या या मुख्य लेखाधिकारी यांच्याकडे असायच्या. कार्यालयाला जेव्हा एखादी वस्तु रोखीने खर्च करायची असेल किंवा एखाद्या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन करायचे असेल तेव्हा कार्यालय प्रमुखांचे सहमतीने पाहिजे तेवढीच रक्कम काढली जात असे.आणि खर्च रक्कम व तिजोरीत शिल्लक रक्कम याचे रजिस्टर ठेवले जायचे , विशेष म्हणजे दसरा दिवाळी तसेच इतर सणांच्या वेळी या तिजोरीची मनोभावे पूजा देखील केली जात असे.सायंकाळी कार्यालय बंद झाल्यावर लेखाधिकारी हे काळजीपूर्वक ती तिजोरी बंद करून ती इतर कोणी बनावट चावीने खोलुन त्यातील रोख रक्कम गायब करु नये, यासाठी त्या तिजोरीला कागदी सील लावुन त्यावर तो स्वतःची सही करत असे.आणि दुसऱ्या दिवशी कार्यालयात आल्यावर पहिल्यांदा तो त्या तिजोरीची पाहणी करत असे.एवढी सुरक्षितता आणि खबरदारी घेतली जात होती.परंतु आज संगणकीय युगात शासनाचे सर्व व्यवहार हे ऑनलाईन पद्धतीने होत असल्याने या लोखंडी तिजोऱ्या कालबाह्य झालेल्या दिसत आहेत तर काही अडगळीच्या ठिकाणी पडलेल्या आढळून येत असुन सामाजिक वनीकरण विभागाने ती आता उघड्यावर फेकलेली दिसत आहे.
