मुंबई: चर्चगेट येथील एसएनडीटी महिला विद्यापीठात “छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव” हा कार्यक्रम नुकताच उत्साहाने साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये शिवाजी महाराजांच्या कार्याची ओळख निर्माण करणे व त्यांच्यापासून प्रेरणा देणे हा या कार्यक्रमामागील उद्देश होता. एसएनडीटी कला, एस.सी.बी. वाणिज्य व विज्ञान महिला महाविद्यालय तसेच पी.व्ही.डी.टी. शिक्षणशास्त्र महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीत व विद्यापीठ गीताने झाली. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू प्रो. डॉ. उज्वला चक्रदेव उपस्थित होत्या, तर प्रमुख वक्ते म्हणून डॉ. अतुल्य पाटील तसेच कुलसचिव विलास नांदीवडेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. आपल्या भाषणात कुलगुरूंनी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव यांचे स्वागत प्राचार्या आदिती सावंत यांनी केले. अध्यक्षांचा परिचय नवनाथ शिंगवे यांनी, तर प्रमुख वक्त्यांचा परिचय डॉ. किशोर कदम यांनी करून दिला. आपल्या प्रेरणादायी भाषणात प्रमुख वक्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याचा, त्यांच्या शौर्याचा, दूरदृष्टीचा व प्रशासन कौशल्याचा प्रभावी आढावा मांडला. त्यांच्या विचारांमधून विद्यार्थ्यांनी राष्ट्रप्रेम, स्वाभिमान व कर्तव्यनिष्ठा यांचे धडे घ्यावेत, असा संदेश त्यांनी दिला.
वित्त व लेखा अधिकारी विकास देसाई यांनी “हिरकणी” या कथेचे अभिवाचन केले. तसेच संगीत विभागाच्या विद्यार्थिनींनी “शिवकालीन पराक्रमाची गाथा” हा पोवाडा सादर केला. कार्यक्रमात महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे नियोजन प्रो. डॉ. रामकुमार प्रधान यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा. मोनाली राऊत यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रो. डॉ. संजय शेडमाके, प्राचार्य, पी.व्ही.डी.टी. शिक्षणशास्त्र महाविद्यालय यांनी उपस्थित मान्यवरांचे व सर्व उपस्थितांचे आभार मानले.
