नाही भेटला असा कोणी
ज्याने मला छळले नाही’
स्लग- निरोप समारंभात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी
स्वाती घोसाळकर
मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेत त्यांच्यासह इतर एकुण ९ आमदारांसाठी आयोजित निरोप समारंभात जोरदार फटकेबाजी केली. शेरो शायरी आणि कोट्या करत त्यांनी सभागृहातील आपल्या शेवटच्या भाषणात खास ठाकरे शैलीच छाप पाडली. मित्र कोण आणि शत्रू कोण गणितं साधे कळले नाही. नाही भेटला असा कोणी ज्याने मला छळले नाही अशी सुरेश भटांची गजल म्हणत आपल्या वेदनेलाही वाट मोकळी करून दिली.
उद्धव ठाकरेंनी विंदा करंदीकर आणि सुरेश भट यांच्या कवितेतील ओळींचा दाखला देत आपली खंत व्यक्त केली. “विंदा करंदीकरांनी कवितेत लिहिलं आहे, केले कुणास्तव किती हे कधी मोजू नये. होणार त्याची विस्मृती त्याला तयारी पाहिजे, जो अनुभव मी घेतोय. डोक्यावरी जे घेवूनी आजही इथे नाचती, घेतील ते पाय तळी त्याला तयारी पाहिजे. हे सगळं आयुष्य आहे. जे डोक्यावर घेऊन नाचतात, तेच एकदिवस पायदळी तुडवायला बघत नाहीत. कारण त्यांना स्वत:ला काही पाहिजे असतं. त्यावेळी कोणी काय दिलं हे न पाहता पुढे जात असतात”, अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली.
“हे जरी खरे असले तरी मला जी संधी मिळाली त्यावेळी मी जे केलं ते प्रामाणिकपणे केलं. त्यामुळे महाराष्ट्राची जनता मला कुटुंबातील एक सदस्य मानते. मी या मायबाप जनतेला मानाचा मुजरा करुन आपल्या सर्वांचा या सभागृहात निरोप घेतोय”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
पु. ल. देशपांडेनंतर उद्धव ठाकरे
महाराष्ट्राचे ‘कोट्या’धीश- फडणवीस
मुंबई : पुल देशपांडे यांच्यानंतर महाराष्ट्रात जर कुणाला ‘कोट्या’धीश म्हणावे तर मी ते उद्धव ठाकरे यांना म्हणेन असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना निरोप दिला. उद्धव ठाकरे यांच्या व्यक्तिमत्वात राजकारणाची कमी आहे, त्यांचा स्वभाव राजकारणी नाही. कोणताही निर्णय घेताना ते परिणामांची चिंता करत नाहीत असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
उद्धव ठाकरे हे चांगले छायाचित्रकार असून महाराष्ट्राच्या विविध छटा त्यांनी त्यांच्या कॅमेरात कैद केल्या ‘महाराष्ट्र देशा’ आणि ‘माझा विठ्ठल’ हे त्यांचे फोटो पाहिल्यानंतर त्यांचं संवेदनशील मन समोर येतं असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
राजकारणात ते लवकर आले, पण २०१० नंतर आमची जास्त जवळीक आली. मैत्रीची भावना आमच्यात त्यावेळी निर्माण झाली. आता देखील आहे, मात्र राजकीय भूमिका आता आमच्या वेगळ्या झाल्या. त्यांनी एखादा निर्णय घेताना कधीही परिणामाचा विचार केला नाही. ज्याला राजकीय चेहरा नाही अशा सर्वसामान्यांना राजकीय चेहरा देण्याच काम त्यांनी केलं. बाळासाहेबांनी सर्वसामान्य चेहऱ्यांना संधी देत अनेकाना मोठं केलं. तीच परंपरा उद्धव ठाकरेंनी कायम ठेवली असेही फडणवीस म्हणाले.
उद्धव ठाकरेसाहेबांना निरोगी
दीर्घायुष्य लाभो – एकनाथ शिंदे
मुंबई : उद्धव ठाकरे यांनी निरोप देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलणार याकडे आज तमाम महाराष्ट्राच लक्ष होते. विशेषता शिवसेनेतील फुटीनंतर पहिल्यांदाच शिंदे ठाकरेंबाबत अराजकीय भाष्य करणार होते. विधिमंडळाची परांपरा जपत आज एकनाथ शिंदेनीही उद्धव ठाकरे यांचा पहिल्यांदाच ‘साहेब’ असा उल्लेख केला आणि त्यांना शुभेच्छाही दिल्या. उद्धव ठाकरे यांचं विधान परिषदेतील आमदार म्हणून हे शेवटचे अधिवेशन आहे. त्या निमित्ताने निरोपाच्या भाषणात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना शुभेच्छाही दिल्या.
उद्धव ठाकरेंबद्दल बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, उद्धव ठाकरेसाहेब निरोप घेत आहेत. त्यांना निरोगी आयुष्य लाभो. त्यांच्या राजकीय आयुष्याला खूप शुभेच्छा.
स्माईल प्लीज…
विधानपरिषदेतील ९ आमदरांच्या निरोप समारंभानिमित्त ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री तसेच शिंदेंच्या शिवसेना पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे एकाच फोटोत आले आणि फोटोग्राफरांनी स्माईल प्लीजची विनंती करताच असा एतिहासिक फोटो अखेर क्लीक झाला. (छाया – पी. सुशील)
