भोंदूबाबाच्या आहारी जाणाऱ्या केसरकरांच्या राजीनाम्याची मागणी
राजन चव्हाण
सावंतवाडी: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी ठाकरे सेना आक्रमक बनली असून सेनेच्या वतीने शहरात आज जोरदार आंदोलन करण्यात आले. अशोक खरात प्रकरणी आमदार दीपक केसरकर यांच्या राजीनाम्याची मागणी यावेळी करण्यात आली. तसेच या प्रकरणाची ‘एसयटी’ मार्फत सखोल चौकशी व्हावी अशी ही मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली.
तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने शिवसैनिक एकत्र आले आणि त्यांनी मोर्चा काढत प्रांत कार्यालयावर धडक दिली.
सेनेच्या वतीने प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमच्या मागणीचे हे निवेदन पाठवण्यात यावे अशी विनंती यावेळी शिष्टमंडळाने केली. या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
भोंदू बाबा अशोक खरात यांच्याशी माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांचे नेमके संबंध काय आहेत याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी ठाकरे सेनेने केली आहे.
ठाकरे सेनेचे उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार यांनी एका पत्रकार परिषद ही मागणी केली. यावेळी रमेश गावकर राजू रमेश सावंत विनोद काजरेकर विनोद ठाकूर आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
खरात प्रकरणात केसरकर यांची बाजू विसंगत वाटत आहे या प्रकारामुळे सावंतवाडी चे नाव बदनाम झाले आहे अशी टीका कासार यांनी केली आहे.
महिला काँग्रेसची मागणी
दरम्यान खरात यांच्याशी नाव जोडल्याने आणि खरात सोबत आमदार दीपक केसरकर यांचे फोटो प्रसिद्ध झाल्याने सावंतवाडी शहराची आणि पर्यायाने मतदार संघाची प्रतिमा मलीन झाली आहे या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केसरकर यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा साक्षी वंजारी यांनी केली आहे.
प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, या गंभीर प्रकरणी रूपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असताना केसरकरांचे नाव वारंवार समोर येणे ही सावंतवाडी करांसाठी लज्जास्पद बाब आहे. तेव्हा त्यांचीही ‘ एसआयटी ‘ मार्फत चौकशी व्हावी आणि तोपर्यंत त्यांनी पदावरून दूर व्हावे अशी मागणीही त्यांनी केली आहे.
मतदार संघाचा आमदार निधी नाशिक,सिन्नर भागात वळवल्याची चर्चा असून याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.
केसरकर यांनी स्वतःहून आमदारकीचा राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जावे अन्यथा काँग्रेस पक्षातर्फे जन आंदोलन उभारण्यात येईल असा इशाराही वंजारी यांनी दिला आहे.
आरोप चुकीचे- केसरकर
विरोधकांकडून माझ्यावर जे राजकीय आरोप केले जात आहेत ते अत्यंत चुकीचे आहेत असे स्पष्टीकरण शिंदेसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी दिले आहे.
कॅप्टन खरात यांचे जे कृत्य समोर आले आहे ते अत्यंत निंदनीय आहे. त्या संदर्भात सखोल चौकशी होऊन त्यांच्यावर कठोर कारवाई होईलच असेही केसरकर यांनी म्हटले आहे
ईशानेश्वर मंदिराच्या रस्त्याच्या कामासाठी खरात हे मुंबईला आले होते त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमची भेट झाली होती. ‘तो ‘फोटो त्यावेळेचा आहे आणि ही वस्तुस्थिती आहे. मी स्वतः देवभक्त असल्याने आणि नेहमी शिर्डीला जात असल्याने वाटेत सिन्नर हे गाव लागते त्यामुळे माझे ईशानेश्वर मंदिरात जाणे होत असे.माझा जो फोटो व्हायरल होत आहे तो त्यांच्या मुलीच्या लग्नातील आहे.
संजय राऊत यांनी माझ्यावर केलेले आरोप धादांत खोठे आहेत असा खुलासाही केसरकर यांनी केला आहे.
केसरकर हे शालेय शिक्षण मंत्री असताना त्यांचे खाते अशोक खरात चालवत होते असा आरोप राऊत यांनी केला होता.
