कोकणच्या हापूसवर अस्मानी संकट ?
मुंबई : अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांच्या मते यंदा केवळ २० टक्केच हापूस उत्पादन होणार आहे. त्यामुळे केवळ आंबा उत्पादकच नाही तर हापूसशी संबंधित सर्व पूरक व्यवसायांवरही मोठा परिणाम होताना दिसतोय.
कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर हापूसची लागवड केली जाते. काही जाणकारांच्या मते, हापूस आणि त्याच्याशी संबंधित व्यवसायातून सुमारे २५०० कोटी रुपयांची उलाढाल होते. रत्नागिरीत सुमारे १.२० लाख हेक्टर, सिंधुदुर्गात ३४ ते ३५ हजार हेक्टर आणि रायगडमध्ये ११ ते १२ हजार हेक्टर क्षेत्रावर आंबा लागवड आहे.
मात्र, यंदा उत्पादन घटल्यामुळे ट्रान्सपोर्ट, पॅकिंगसाठी लागणारे साहित्य, गवत, पेट्यांसाठी लाकूड, मजूर, गाड्या अशा सर्वच क्षेत्रांवर परिणाम झाला आहे. निरूळ गावातील स्वरूप गांगण यांसारखे हापूस वाहतूकदारही या संकटामुळे अडचणीत आले आहेत.
