दादर-रत्नागिरी पॅसेंजर
ट्रेनसाठी मनसे आक्रमक
मुंबई : मुंबईतून कोकणात जाणाऱ्या सामान्य चाकरमान्यांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेली रत्नागिरी-दादर पॅसेंजर ट्रेन पुन्हा सुरु करण्यासाठी आता राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. यापूर्वी कोकणात जाणारी ही पॅसेंजर ट्रेन दादर ते रत्नागिरी अशी चालवली जायची. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये रेल्वे खात्याने कोणतेही कारण न देता ही एक्सप्रेस ट्रेन फक्त दिव्यापर्यंतच चालवण्याचा निर्णय परस्पर घेतला होता. यामुळे कोकणात जाणाऱ्या अनेक प्रवाशांची प्रचंड गैरसोय होते.
त्यामुळे आता मनसेने ही पॅसेंजर ट्रेन दिवा स्थानकात न थांबता पूर्वीप्रमाणे दादर स्थानकापर्यंत चालवण्यात यावी, यासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. येत्या १५ ते २० दिवसांमध्ये दादर-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेनबाबतची आमची मागणी मान्य झाली नाही तर आम्ही उत्तर प्रदेश आणि बिहारला जाणाऱ्या एक्स्प्रेस ट्रेन रोखून धरु, असा इशारा मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिला आहे.
