भोंदूबाबा ; पुरोगामी महाराष्ट्राला लागलेली कीड

कॅप्टन म्हणवून घेणाऱ्या भोंदू बाबा अशोक खरात या वासनांधांचे विविध लीलांचे तपशील बाहेर येत असल्याने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. या प्रकरणाशी संबंधित 58 व्हिडिओ बाहेर पडल्याने आणि जवळपास 100 हून अधिक व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागल्याने या प्रकरणातील संवेदनशीलता आणि व्याप्ती खूप वाढलेली बघायला मिळत आहे. सामाजिक, राजकीय, प्रशासकीय अशा उच्चभ्रू क्षेत्रातील लोक या भोंदूबाबाचे भक्त असून या भोंदूबाबामुळे त्याच्या भोंदू भक्तांचेही धाबे दणाणले आहेत. या भोंदूबाबच्या चौकशीतून आखणी धक्कादायक गोष्टी समोर येतील ज्याने महाराष्ट्रात आणखी खळबळ माजेल अनेकांचे बुरखे फाटले जातील. या भोंदूबाबावर कठोरात कठोर कारवाई व्हायलाच हवी पण केवळ त्याच्यावरच नव्हे तर त्याच्या भक्तांवर देखील कारवाई व्हायला हवी कारण यांच्यामुळे पुरोगामी महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय अवस्थेचे लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. या भोंदूबाबा आणि त्याच्या अंध भक्तांमुळे पुरोगामी महाराष्ट्राची मान शरमेने खाली झुकली आहे. शिव, शाहू, फुले, आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात अशाप्रकारे भोंदूबाबांचे पेव फुटणे ही एकप्रकारे पुरोगामी महाराष्ट्राची अधोगतीच आहे. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने समाजातील विवेक, विज्ञाननिष्ठा आणि कायद्याचा वचक पार धुळीस मिसळलेला बघायला मिळत आहे. अर्थात याला आपले राजकीय नेतेही तितकेच जबाबदार आहेत. संविधानाची शपथ घेऊन आमदार, खासदार, मंत्री बनणारे आमचे नेते अशा भोंदूबाबांच्या कच्छपी लागत असेल तर या भोंदूबाबांवर कायद्याचा वचक कसा राहील? ज्या नेत्यांनी समाजासमोर आपल्या वर्तणुकीतून आदर्श निर्माण करायचा असतो तेच नेते तर जर अशा भोंदूबाबांचे पाय धुवत असतील तर भोंदूबाबांना कायद्याचा धाक कसा राहील ? जादूटोणाविरोधी कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. या कायद्यासाठी डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी हौतात्म्य पत्करले. आजची परिस्थिती पाहिली तर डॉ नरेंद्र दाभोळकर यांचे हौतात्म्य वाया गेले की काय ? असा प्रश्न पडतो कारण ज्या कायद्यासाठी त्यांनी स्वतःच्या जीवाचे बलिदान दिले त्या कायद्याचे अस्तित्वच आज कोठे दिसत नाही. आज 21 व्या शतकातही लोक अंधश्रद्धेच्या किती आहारी गेले आहेत ते या प्रकरणाने दाखवून दिले आहे. अजूनही लोकांना श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक समजत नाही. अध्यात्माच्या नावाखाली लोक अशा भोंदूबाबांच्या नादी लागतात आणि स्वतःसह समाजाचेही नुकसान करून घेतात. लोकांच्या श्रद्धेचा ( अंध ) बाजार मांडून अशोक खरात सारखे भोंदू बाबा कॅप्टन फाईल बनवतात. अर्थात अशी फाईल असलेला अशोक खरात हा एकमेव भोंदूबाबा नाही. गावागावात, शहरशहरात असे अनेक भोंदूबाबा आहेत जे भक्तांच्या अंधश्रद्धेचा फायदा घेऊन आपल्या तुंबड्या तर भरतच आहेत पण महिला भगिनींच्या अब्रूही लुटत आहेत. अशोक खरात प्रमाणेच श्रद्धेचा बाजार मांडून भक्तांना लुबाडणाऱ्या गावागावातील या भोंदूबाबांची देखील छाटणी करायला हवी. आज हा खरात आहे, उद्या दुसराच कोणी…उभा राहील ? तेंव्हा थोतांड प्रवृत्तीच्या या भोंदूबाबांचा बीमोड होणे आवश्यक आहे त्यासाठी जादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हायला हवीच त्याशिवाय लोकांनीही आपला विवेक जागृत ठेवून अशा भोंदूबाबांच्या नादी लागणे सोडून द्यावे. भोंदूबाबा म्हणजे पुरोगामी महाराष्ट्राला लागलेली कीड आहे ही कीड मुळापासून उपटून टाकायलाच हवी.
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *