आत्माराम मोरे स्मृती क्रिकेट स्पर्धा
लीलावती हॉस्पिटल उपांत्य फेरीत
मुंबई : आत्माराम मोरे प्रतिष्ठान आयोजित लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया पुरस्कृत ज्येष्ठ पत्रकार स्व. आत्माराम मोरे स्मृती चषक आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धेत लीलावती हॉस्पिटलने बलाढ्य केडीए हॉस्पिटल-अंधेरी संघाचा ७ विकेटने पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. लीलावती हॉस्पिटलचा राहुल जांभळे व केडीए हॉस्पिटलचा अॅलन गावद्या यांना उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार देऊन क्रीडाप्रेमी अरुण माने, रुग्णालयीन क्रिकेटपटू प्रदीप क्षीरसागर, मनोहर पाटेकर, श्रीकांत दुधवडकर, भरत पेडणेकर, चंद्रकांत करंगुटकर, रुपेश कोंडाळकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदींच्या उपस्थितीत गौरविण्यात आले.
शिवाजी पार्कमधील बीएमसी खेळपट्टीवर लीलावती हॉस्पिटल विरुध्द केडीए हॉस्पिटलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. अॅलन गावद्या (३६ चेंडूत ६२ धावा), अलकेत तांडेल (३२ चेंडूत ३३ धावा), सुरज जयस्वाल (२२ चेंडूत ३४ धावा) यांनी दमदार फलंदाजी केल्यामुळे केडीए हॉस्पिटलने मर्यादित २० षटकात ६ बाद १५८ धावांचा टप्पा गाठला. स्वकीत पांचाळने २५ धावांत ३ बळी व जगदीश कोठारेने ३६ धावांत २ बळी घेतले. विजयी लक्ष्य गाठताना धावगती जलद करण्याच्या नादात दुसऱ्या षटकामध्ये भरवंशाचा सलामीवीर मनोहर पाटेकरला (१३ चेंडूत १३ धावा) केडीएच्या दक्ष क्षेत्ररक्षकांनी धावचीतद्वारे टिपले. परंतु त्यानंतर मैदानात उतरलेल्या राहुल जांभळे (३९ चेंडूत ६४ धावा), संदीप कणसे (३७ चेंडूत नाबाद ३९ धावा), संदेश पंधेरे (१३ चेंडूत नाबाद २२ धावा) यांनी आक्रमक फलंदाजी करून लीलावती हॉस्पिटलचा विजय १८.१ षटकात ३ बाद १५९ धावा फटकावून साकारला. दुसऱ्या सामन्यात सोमैया हॉस्पिटलने सायन हॉस्पिटलला ३५ धावांनी पराभूत करतांना प्रकाश पुजारी (२९ चेंडूत ५७ धावा) व दर्शन गुरव (३९ चेंडूत ४९ धावा) यांची फलंदाजी विजयासाठी उपयुक्त ठरली. संभाजी थोरात (४० चेंडूत ४२ धावा) व निलेश चव्हाण (१२ चेंडूत नाबाद २० धावा) यांनी छान फलंदाजी करूनही सायन हॉस्पिटलला १३६ धावांपर्यंतच मजल मारता आली.
