सेक्स, सौंदर्य,सत्ता आणि संपत्ती भोंदूगिरीचे चार खांब !
सेक्स, सौंदर्य, सत्ता आणि संपत्ती हे मनुष्य जातीचे कायम आकर्षण केंद्र राहिले आहे आणि संपूर्ण आयुष्य त्याचे याच्या भोवती फिरत असते.
यापैकी कुठले तरी एक किंवा दोन किंवा सर्व मिळवण्यासाठी सतत त्याची धडपड सुरू असते. त्यासाठी तो कायम प्रयत्न करीत असतो. जर सहज मार्गाने प्राप्त झाले तो उपभोग घेत असतोच. मात्र खुपदा त्याच्या या सुप्त इच्छा जर संधी मिळाली आणि गुपित रहात असेल तर तो सहज आपली ही छुपी प्रवृती बाहेर काढतो.
कुठलाही बदमाश भोंदूबाबा, मग तो भविष्य, कुंडली बघणारा असो, पूजा पाठ करणारा, आश्रम चालवणारा मठपती किंवा अन्य कुणीही बदमाश भोंदू हे अतिशय योग्य रीतीने जाणतो
आता खरात प्रकरणाचे बघाल तर हे प्रकरण कधीच बाहेर आले नसते जर त्याच्या पीए याने त्याचे पेन ड्राईव्ह चोरले नसते आणि महिलांना ब्लॅक मेल करण्याचा प्रयत्न केला नसता.
सर्वजण तो लोकांना लघवी प्यायला द्यायचा किंवा वीस फूट नाग काढायचा हे सर्व किंवा असेच प्रकार यापूर्वी अनेक भोंदू, तांत्रिक करीत आले आहेत. विष्टा खायला लावणे, मुत्र प्राशन, विकृत समागम हे करायला लावण्या मागे बदमाश भोंदूचे एक शास्त्र असते की, सदरची महिला किंवा पुरुष आपल्या किती वश आहे. तीन वर्ष एखाद्या महिलेवर बलात्कार कसा होऊ शकतो ?
यामागे महिलांची देखील मानसिकता समजून घेतली पाहिजे.  इतक्या सर्व महिला समाजात वावरत असतात. सर्वच महिला काही बदमाश भोंदू बाबाच्या नादी लागत नाही. शिवाय प्रत्येक महिलेला एक सिक्स सेन्स असतो, समोरचा पुरुष कुठल्या हेतूने बघतो आहे, स्पर्श करतो आहे , बोलतो आहे हे पटकन समजते. मात्र महिलाना दाखवलेले स्वप्न हे इतके भव्य असते, शिवाय भोंदूच्या एजंट लोकांनी त्याची अशी काय स्तुती केलेली असते त्यात बड्या बड्या लोकांचा राबता पाहिल्यावर महिला तिला मिळणाऱ्या सिग्नल्स कडे सपशेल दुर्लक्ष करते आणि मग भोंदूगिरीच्या जाळ्यात अडकत जाते. त्यासोबत खुपदा महिलाना छोटे मोठे लाभ होत असतात त्याचा मोह देखील त्यांना आवरला जात नाही आणि त्या मग कुटुंबाशी प्रतारणा करीत सरळ भोंदू बाबाच्या लीन होतात. बाहेरख्याली पणात देखील हेच घडत असते.महिला पुरुषांच्या आधीन जाते  आणि नवरा सोबत प्रतारणा करीत असते.
एकदा एखादी महिला जर एखाद्या पुरुषाच्या आधीन झाली तर तो तिचा संबंध तिचा फायदा दाखवून इतर पुरुषासोबत सहज करून देऊ शकतो, त्यात गुपित रहाण्याची खात्री आणि विश्वास असल्याने महिला सहज तयार होते
पुरुषांच्या संदर्भात बोलायचे झाल्यास या ट्रॅप मध्ये उद्योगपती, बडे अधिकारी, राजकारणी सहज येतात याची कारणे शोधली तर ती देखील नवी नाहीत. ज्याच्या जीवनात कुठल्याही प्रकारची अस्थिरता असते मग ती सत्ता असो, पद असो की सेक्स पॉवर असो. एका वयानंतर कुठल्याही पुरुषांची समागम करण्याची शक्ती क्षीण होत जाणार हा निसर्ग नियम आहे. मग ती कायम ठेवण्यासाठी काही पुरुष व्यायाम करतील, काही आयुर्वेदिक औषध घेतात काही आलोपथी औषध घेत असतात. जस जसे वय होते तसे सेक्स पॉवर कमी होते मात्र पैसा, पद, सत्ता बघून अनेक ललना आपल्या सौंदर्याची जादू चालवत असतात, मात्र या तरुण महिलेला पूर्ण पडू का याबद्दल ५०/५५/६० वयाच्या मनात संशय असतो. त्यामुळे एखाद्या अशा भोंदू बाबाने असे काही चमत्कारिक औषध दिले त्यात ज्यादा प्रमाणात व्हायग्रा सारख्या औषधी टाकून दिल्या आणि मानसिक शक्ती दिली की औषध आपले काम करते आणि मानसिक आधार श्रद्धा सेक्स करण्याची मानसिक तयारी करते त्यात एकदा व्यक्ती यशस्वी झाला की मग तो सहज त्या भोंदू बाबाच्या चरणी लीन होतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे तिरुपती बालाजी मंदिराचा पुजारी हा खास व्यक्ती पाठवून लाखो रुपयांचे ओशोनिक जल आणि मध मागवून घेत असे .
वास्तविक सेक्स हे निसर्गाने प्रजोत्पादन करण्यासाठी निर्माण केलेली व्यवस्था आहे, त्यात आनंद यासाठी भरला की, स्त्री पुरुषाने ते करावे आणि प्रकृती पुढे चालावी. घडीभर विचार करा त्यात जर निसर्गाने आनंद भरला नसता तर स्वतः हून कुठल्या स्त्री पुरुषाने असले कृत्य केले असते? आणि एवढी जगाची लोकसंख्या तरी वाढली असती का ?
राजकीय व्यक्तिना केवळ बाहेरचेच नाही तर पक्षाच्या अंतर्गत देखील स्पर्धा आणि शत्रू असतात त्यामुळे लोकांच्या समोर आपण देखील धार्मिक आहोत ही प्रतिमा प्रमाणित करण्यासाठी आणि बाबाच्या भक्तांची आयती मते मिळवण्यासाठी मोठे मोठे राजकीय नेते बाबा बुवांचा भजनी लागलेले, त्यांच्या धर्मपीठावर गेलेले आपण पाहिले, यातून लालकृष्ण आडवाणी, अटलबिहारी वाजपेयी ते अलिकडचे नरेंद्र मोदी अमित शहा देखील सुटलेले नाही. या प्रत्येक बाबाची वेगवेगळी खासियत असते कुणी गुरू मंत्र देतो, कुणी काही तावीज करून देतो, कुणी काही पाणी देतो जे एक हजार दिवस जप करून त्यात मंत्र शक्ती उतरली असल्याचा दावा करतो. काही प्राण्याचे दुर्मीळ अवयव, किंवा अघोरी पूजा करण्यास सांगतो असे नवे नवे प्रकार भोंदू बदमाश करीत असतात. त्यात राजकीय लोकांच्याकडे गडगंज पैसा असल्याने त्यांना काही लाख किंवा कोटींची मदत आपल्या धार्मिक गुरुला करणे मुळीच अवघड असत नाही.
पण यासर्वात स्वार्थ, सत्ता, सौंदर्य यांनी बुद्धी बधीर झालेले नेते मंडळी एक गोष्ट विसरतात की धर्माची निर्मिती ही मनुष्याला सत्य, अहिंसा, करुणा, मैत्री, प्रेम आणि बंधुत्व शिकवण्यासाठी झाली आहे. ईश्वर जर दुष्प्रवृतीच्या विरोधात लढून ईश्वर झाला असेल तर तो आपल्याला किंवा हा तथाकथित बाबा बुवा जी भोंदूगिरी करतो आहे त्याला सत्यवादी ईश्वर कसा मदत करेल ? इतर सर्व लोकांना सोडून तो माझ्यात जर लायकी नसेल तर मला तो का निवडेल ? आणि माझ्यात जर लायकी असेल मला तो का डावलेल असा साधा प्रश्न जरी व्यक्तीने स्वतःला विचारला तरी तो अशा ट्रॅप मध्ये फसणार नाही.
प्रामुख्याने आपल्या महाराष्ट्रात प्रचंड मोठी अशी विवेकवादी, सुधारणावादी संत आणि समाज सुधारकांची परंपरा आहे. ज्यांनी आपल्या अभंग, ग्रंथ आणि प्रबोधनातून अशा गोष्टीवर वेळोवेळी आसूड ओढले आहे. मात्र देशातील प्रचंड लोकसंख्या, नोकऱ्या कमी, अपुरी साधने आणि बड्या भांडवलदार, राजनेते आणि धार्मिक प्रचारक यांची युती झाल्याने विविध माध्यमातून दैववादाचा प्रचार मोठ्या प्रमाणात केला जातो मग वेगवेगळ्या उत्सवातून , सण, टीव्ही सिरीयल, सिनेमे , साहित्य , धार्मिक मेळे आणि बैठका यातून कायम रतीब घातला जात आहे. असे करण्या मागे सर्व सामान्य लोकांना त्यांच्या दुःख, समस्याचे खरे कारण समजू नये हे आहे. त्यांना योग्य शिक्षण का मिळत नाही? आरोग्याच्या सुविधा का उपलब्ध नाही ? त्याचा मुलगा इतका शिकून त्याला रोजगार का नाही ? याचे खरे कारण देशातील सत्ताधारी आहेत. मात्र लोकांनी सत्तेला लक्ष करण्या ऐवजी आपल्या नशिबाला दोष देत रहावा, माझ्या मागे साडेसाती आहे, माझे ग्रह ठीक नाही असा दैववादी विचार करावा. त्यामुळे आपण क्रोनी कॅपिटलिसम चे बळी आहोत हे त्यांना उमजू नये
कुठलाही धर्म किंवा धर्म संस्थापक हा मानवी कल्याणाची मूल्ये रुजवत असतो. प्रेम,  करुणा, अहिंसा , शील , सदाचार हा त्याच्या शिकवणुकीचा गाभा असतो मात्र त्याच्या मागे त्याचे बदमाश भक्त आपल्या फुकट उत्पन्नाची आणि ऐशोआरामाची सोय म्हणून त्याच्या नावाने नाही नाही ते देव्हारे माजवत असतात आणि अज्ञानी, हतबल, लालची, सत्ता लोलुप लोकांना आरामात लुटत असतात.
हे सर्व प्रकार बंद व्हावे असे वाटत असेल तर आपण जे आपल्या धर्माचे अधिकार कुठल्या पुजारी, बाबा, मंदिर किंवा तीर्थस्थानात न ठेवता आपल्या स्वतः जवळ ठेवावे. आपल्या  धर्माची मूळ पुस्तकं आपण स्वतः आणून अभ्यास करावी. केवळ एक पुस्तक न वाचता वेगवेगळी पुस्तक वाचावी. कुणी विचारवंत विवेकी आणि साक्षेपी भावनेने काही सांगत असेल तर ते ऐकावे, बरे वाटते किंवा तर्क शुद्ध वाटते म्हणून लगेच विश्वास न ठेवता त्याचा स्वतः अभ्यास करावा, पडताळून पहावे , चिंतन करावे त्यानंतर जर ते अनुकरणीय असेल तर नक्की कृतीत आणावे.
धर्मात जर चुकीचे मानवता विरोधी सांगितले असेल तर ते नाकारण्याची हिंमत आपण आपल्या संत आणि महापुरुषांच्या प्रमाणे ठेवावी. तरच महाराष्ट्र या भोंदूगिरातून बाहेर येईल अन्यथा खरात प्रकार हे भोंदूगिरीच्या पर्वताचे छोटे टोक आहे, अजून असे लाखो भोंदू ठीक ठिकाणी धर्मक्षेत्रात, मंदिरात, आश्रमात, सर्वत्र व्याप्त आहेत.
मी अतिशय प्रामाणिक कळकळीने हे लिहिले, यामागे कुठल्या धर्म अथवा देवाचा अपमान करण्याचा हेतू नसून देव आणि धर्माचे चेहरे लाऊन चालणाऱ्या विकृतीवर प्रहार करण्याचा हेतू आहे. तुम्ही हे सर्व वाचले त्याबद्दल आपले आभार. यावर विचार करा आणि मी जे बोलतो त्यात तथ्य असेल तर इतराना सांगा. किंवा हा लेख आपण सहज पुढे पाठवू शकता. धन्यवाद
-किरण सोनावणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *