जय श्रीरामाच्या जयघोषाने दुमदुमली कल्याण नगरी

रामनवमी निमित्त भव्य शोभायात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

कल्याण : श्रीरामनवमी निमित्त कल्याण शहरात आयोजित करण्यात आलेल्या सकल हिंदू समाजाच्या भव्य शोभायात्रेला नागरिकांचा नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. माजी आमदार नरेंद्र पवार, कल्याण विकास फाऊंडेशनच्या अध्यक्षा नगरसेविका हेमलता पवार, तसेच शहरातील विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने या शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते.  मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्र यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित या शोभायात्रेत मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला. पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या शेकडो महिला, अनेक रामभक्त आणि युवक त्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या शोभायात्रेला कल्याण पश्चिमेतील किल्ले दुर्गाडी येथील भवानी चौक येथून सायंकाळी प्रारंभ झाला. दुर्गाडी देवीची आरती करून शोभायात्रा सुरू झाली. तिथून पुढे लालचौकी, आग्रारोड, सहजानंद चौक, देवी अहिल्याबाई होळकर चौक, टिळक चौकमार्गे पारनाका येथील श्रीराम मंदिरापर्यंत अत्यंत उत्साहात काढण्यात आली. त्यानंतर येथील श्रीराम मंदिरामध्ये महाआरती करून शोभायात्रेचा समारोप करण्यात आला.

विशेष म्हणजे या शोभायात्रेमध्ये प्रभू श्रीराम मंदिराचा भव्य चित्ररथ, महापराक्रमी श्री बजरंगबलींची आकर्षक झांकी, विविध पारंपरिक चित्ररथ, सांस्कृतिक सादरीकरणे तसेच साहसी खेळांचे प्रात्यक्षिक यांचा समावेश होता. यामुळे नागरिकांना आपल्या पारंपरिक कला, संस्कृती आणि अध्यात्म यांचे दर्शन घडले. त्यामध्ये कल्याण कल्याण विकास फाऊंडेशनतर्फे वंदे मातरम् ला दिडशे वर्षे पूर्ण झाल्यानिमित माहिती देणारा चित्ररथ, शीख बांधवांचे नववे धर्मगुरू गुरु श्री तेग बहाद्दुर यांच्या पराक्रमावर आधारित चित्ररथ सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.

तसेच त्यासोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, गिनिज बूक मध्ये नोंद झालेले नारायणी लेझीम पथक, प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वर विद्यालय, उज्वला महिला मंडळ व राष्ट्रीय सेविका समिती, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, संस्कृत भारती योग विद्याधाम संस्था, स्वराज्य मित्र मंडळ, लयभारी हास्य क्लब, कराओके, श्री ज्ञानेश्वर माऊली बहुउद्देशीय वारकरी सेवा ट्रस्ट, बालक मंदिर संस्थेचे कॅप्टन रवींद्र माधव ओक शाळेचे लेझीम पथक, विश्व मांगल्य बालसभा, श्री गजानन महाराज शेगाव भक्त, श्री संत राम मारुती, सात संगिनी फाउंडेशन ट्रस्ट, बोहरा आदिवासी नृत्य, भटके विमुक्त समाजाचे मरीआई पोथराज, बंजारा समाजाच्या महिला, इस्कॉन मंदिर संस्था असे शहरातील अनेक नामांकित संस्थांचा समावेश होता.

या रामनवमी उत्सवानिमित्त नागरिकांनी आपल्या घरांवर भगवे ध्वज फडकवून, रांगोळी काढून तसेच दीप प्रज्वलित केल्याने संपूर्ण शहर भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात रंगून गेले होते. या शोभायात्रेचे लालचौकी, आग्रा रोड, सहजानंद चौक, पारनाका आदी मार्गावर जोरदार पुष्पवृष्टीद्वारे स्वागत करण्यात आले. तर या मार्गावर ठिकठिकाणी सामाजिक संस्था, नागरिकांकडून पिण्याचे पाणी, आइस्क्रिम तसेच सरबत वाटप केले जात होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *