विशाल जाधव ठरला कोपरी केसरी २०२६ चा मानकरी
ठाणे : सत्यनारायण प्रतिष्ठान ग्रामस्थ मंडळ कोपरे विरार ( पूर्व ) , यांच्यातर्फे सुवर्णमहोत्सवी वर्षा निमित्त आयोजित केलेल्या श्री सत्यनारायणाच्या भव्य यात्रे निमित्त भरवलेल्या कोपरी कुस्ती केसरी २०२६ या स्पर्धेत मिरा भाईंदर येथील श्री गणेश आखाड्यातील युवा कुस्तीपटू विशाल सुनील जाधवने कोपरी केसरी किताबाचा मान मिळवीला. किताबाच्या झालेल्या लढतीत विशालने कल्याणच्या विजय म्हात्रेचा अटीतटीच्या लढतीत पराभव केला. ही कुस्ती तब्बल अर्धा तास चालली .या कुस्तीमध्ये विशालने झोळी या डावावर विजयला अखेर चित्तपट करत प्रेक्षणीय विजय संपादन केला. त्याला बक्षीस म्हणून आकर्षक चषक , गदा व ११,००० रोख रक्कम देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. या कुस्ती मैदानामध्ये श्री गणेश आखाड्यातील प्रतीक बोबडे , विपीन गौतम , ओम जाधव , अनिकेत यादव यांनी देखील शानदार कुस्त्या करून कुस्तीप्रेमींची मने जिंकली . या मैदानात ठाणे, कल्याण , भिवंडी, मुंबई उपनगर ,मुंबई शहर ,नवी मुंबई भाईंदर, पालघर येथील १५० पेक्षा जास्त कुस्तीपटूंनी भाग घेतला . विशाल सध्या अभिनव कॉलेजच्या कला शाखेतील शेवटच्या वर्षात शिकत आहे. त्याला वसंतराव पाटील व एन.आय.एस.कुस्ती प्रशिक्षक वैभव माने यांचे मार्गदर्शन मिळत आहे. . विशाल सध्या जाणता राजा कुस्ती केंद्र लोणीकंद येथे सराव करतो. या मैदानाचे पालघर जिल्हा कुस्तीगीर संघाचे सचिव व मीरा-भाईंदर महानगर पालिकेच्या अग्निशामन दलाचे अधिकारी .सदानंद पाटील यांनी उत्कृष्ट नियोजन केले होते.
