आत्माराम मोरे स्मृती क्रिकेट स्पर्धा
हॉस्पिटल अंतिम फेरीत
मुंबई : आत्माराम मोरे प्रतिष्ठान आयोजित लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया पुरस्कृत ज्येष्ठ पत्रकार स्व. आत्माराम मोरे स्मृती चषक आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धेत जेजे हॉस्पिटल संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला. अर्धशतकवीर सुभाष शिवगण, सलामीवीर जगदीश वाघेला, अष्टपैलू प्रकाश सोळंकी यांच्या दमदार खेळामुळे जेजे हॉस्पिटलने बलाढ्य रहेजा हॉस्पिटलचा ९ विकेटने पराभव केला. सलामीवीर सचिंद्र ठाकूरने अर्धशतक ठोकूनही रहेजा हॉस्पिटलला उपांत्य उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. सलामीवीर सुभाष शिवगण व सचिंद्र ठाकूर यांना सामन्यातील उत्कृष्ट क्रिकेटपटूचा पुरस्कार देऊन मुंबई क्रिकेट संघटनेचे जॉइंट सेक्रेटरी निलेश भोसले, प्रतिष्ठानचे सेक्रेटरी विराज मोरे व वैभव मोरे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले.
आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी सहकार्याने सुरु झालेल्या स्पर्धेमधील उपांत्य सामन्यात जेजे हॉस्पिटलने नाणेफेक जिंकून रहेजा हॉस्पिटलला प्रथम फलंदाजी दिली. सलामीवीर सचिंद्र ठाकूरने ४८ चेंडूत ५९ धावांची आक्रमक फलंदाजी केल्यामुळे रहेजा हॉस्पिटलने मर्यादित २० षटकात ५ बाद १२९ धावांचा टप्पा गाठला. सलामीवीर जगदीश वाघेला (३३ चेंडूत ४२ धावा) व सुभाष शिवगण (४१ चेंडूत ५३ धावा) यांनी ११ व्या षटकाला पहिल्या विकेटसाठी १०६ धावांची भागीदारी केल्यामुळे जेजे हॉस्पिटलने विजयी लक्ष्य १ बाद १३२ धावा साकारून सहज साध्य केले. शिवतीर्थावर विजय मांजरेकर, रमाकांत देसाई, अजित वाडेकर यांच्यापासून सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, रोहित शर्मा यासारख्या अनेक क्रिकेटपटूंना शिवाजी पार्क मैदानाने घडवले. त्याच मैदानावर ज्येष्ठ पत्रकार स्व. आत्माराम मोरे स्मृतीप्रीत्यर्थ वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या क्रिकेटपटूंसाठी आंतर रुग्णालयीन टी-२० क्रिकेट स्पर्धेचे सातत्य त्यांचे सुपुत्र अश्विनीकुमार मोरे यांनी कायम राखणे, भूषणावह असल्याचे मनोगत एमसीएचे जॉइंट सेक्रेटरी निलेश भोसले यांनी व्यक्त केले.
