ठाण्यात बाटली-कॅनमधून पेट्रोल-डिझेल विक्रीला बंदी
ठाणे : पेट्रोल आणि डिझेलचा तुटवड्याच्या पार्श्वभुमीवर ठाणे जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा मोठा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि ज्वलनशील पदार्थांच्या गैरवापरामुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी बाटल्या, कॅन किंवा इतर भांड्यांमध्ये पेट्रोल-डिझेल विक्रीवर तात्काळ बंदी घालण्यात आली आहे.
ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी पेट्रोलियम नियम २००२ अंतर्गत हा आदेश जारी केला असून, जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांवर इंधन केवळ वाहनांच्या इंधन टाकीतच देण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. कोणत्याही ग्राहकाला प्लास्टिकच्या बाटल्या, कॅन, डबे किंवा इतर कोणत्याही भांड्यांमध्ये सुटे पेट्रोल अथवा डिझेल विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे.
