राष्ट्रवादी महीला प्रदेशाध्यक्षपदाचा रुपाली चाकणकरांचा राजीनामा
भोंदूगिरी भोवली
पोलिसांकडूनही चौकशी होण्याची शक्यता ०
पुणे : भोंदूबाबा अशोक खरातच्या नादी लागलेल्या रुपाली चाकणकरांना अखेर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदानंतर आता राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा द्यावा लागला आहे. शेकडो महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरातचे पायधुणाऱ्या रुपाली चाकणकरांवर राजीनामा देण्यासाठी सर्वचस्तारवरून दबाव होता. राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडे त्यांनी दोन ओळीचा राजीनामा सादर केला.
या संपूर्ण प्रकरणात निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी आपण राजीनामा देत असल्याचं रुपाली चाकणकरांनी म्हटलं आहे.
रुपाली चाकणकर या अशोक खरातच्या शिवनिका या ट्रस्टच्या संचालिका होत्या. त्यावरुन त्यांच्यावर आरोप होऊ लागले. अशोक खरात प्रकरणी जे कुणी दोषी असतील, अशोक खरातशी ज्यांचे कुणाचे संबंध असतील त्यांना सोडणार नाही असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. तसेच अशोक खरातच्या शिवनिका ट्रस्टच्या संचालकांचीही चौकशी केली जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे रुपाली चाकणकर यांचीही चौकशी होण्याची शक्यता असून त्यांची अडचण वाढणार आहे.
शेकडो महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अशोक खरातला अटक करण्यात आली असून त्याची कसून चौकशी सुरु आहे. अशोक खरातसोबत रुपाली चाकणकरांचे काही फोटो व्हायरल झाल्यानंतर चाकणकरांवर टीका होऊ लागली. चाकणकर या अशोक खरातला गुरू मानायच्या, त्यामुळे या आधीच्या काही प्रकरणामध्ये चाकणकरांनी राजकीय हस्तक्षेप केल्याचं समोर आलं होतं.
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांनी राजीनामा द्यावा यासाठी विरोधी पक्षांनी दबाव टाकला. तसेच राष्ट्रवादीतील एका गटानेही ही मागणी केल्याची माहिती समोर आली. त्यानंतर आधी रुपाली चाकणकरांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा दिला आहे.
