सुवर्ण महोत्सवी वर्ष सांगता सोहळ्यानिमित्त रंगली संगीत रजनी
स्मरणिका `प्रतिबिंब’चे प्रकाशन
ठाणे – ज. ए. ई. चे मो. ह. विद्यालय व रमेश परमार कनिष्ठ महाविद्यालय आणि अभिरुची मंडळ सुवर्ण महोत्सवी वर्ष सांगता सोहळ्यानिमित्त २८ मार्च, सायंकाळी ६ वा शाळेच्या प्रांगणात माजी विद्यार्थ्यांद्वारे संगीत रजनीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून माजी विद्यार्थी, प्रसिद्ध निवेदिका, अभिनेत्री संपदा जोगळेकर कुलकर्णी या उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक विकास पाटील यांनी केले.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे कार्याध्यक्ष शैलेंद्र साळवी, उपकार्याध्यक्ष प्रदीप राका, संस्थेचे कोषाध्यक्ष आणि अभिरुची मंडळाचे अध्यक्ष रवींद्र तामरस, संस्थेचे उपकार्यवाह महेश केळकर आणि संचालक मंडळ सदस्य उपस्थित होते.
आपले मनोगत व्यक्त करताना संपदा जोगळेकर यांनी आपल्या शाळेविषयीच्या आठवणी सांगितल्या. शाळेतील खुल्या रंगमंचामुळे त्या रंगभूमी कडे वळल्या आणि आता रंगभूमी कडून प्रत्यक्ष भूमी कडे वळल्या आहेत असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रतिक्षा बोर्डे आणि माजी विद्यार्थी संदेश झारापकर यांनी केले.
शाळेचे माजी विद्यार्थी असलेल्या सर्व कलाकार यांनी शाळेप्रती असलेली त्यांची कृतज्ञता त्यांच्या कलेमार्फत व्यक्त केली. यामध्ये माजी विद्यार्थी संवादिनी वादक डॉ.पंडित, प्रकाश चिटणीस, प्रसिद्ध गायक जगदीश पाटील, प्रसिद्ध गायक धीरज मढवी, गीतकार राजेंद्र ठाकूर, प्रिया सुरेश, खोल्लम आणि ग्रुप, रिद्धेश तरे, वृषाली दाबके आणि वर्षा कोल्हटकर, डॉ. वैशाली दुधे आणि समूह, माजी शिक्षिका- ज्योती साटम, आजी शिक्षक मारुती सोनमोरे, सुनेत्रा मेस्त्री, उमेश महाजन, अर्जिता कुलकर्णी या सर्वांनी आपली कला सादर केली.
शिवाय शाळेचे शुभचिंतक म्हणून प्रसिद्ध गायक अभिषेक कोसंबी यांनी देखील आपली कला सादर केली. तसेच यावेळी कनिष्ठ महाविद्यालयातील माजी शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी माजी शिक्षक आणि आजी, माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे सांगता सोहळा कार्यक्रमात नृत्य, गायन, वादन यांचा त्रिवेणी संगम अनुभवायला मिळाला व कार्यक्रम अविस्मरणीय ठरला.
