‘डिलिव्हरीचा मेसेज, पण सिलेंडर गायब!’
दिव्यात गॅस वितरणात गंभीर गैरव्यवहार
दिवा, दि. २८ मार्च (आरती परब): दिवा शहरात घरगुती गॅस सिलेंडर वितरणामध्ये मोठा गैरव्यवहार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागरिकांनी गॅस सिलेंडर बुक केल्यानंतर कंपनीकडून “सिलेंडर डिलिव्हर झाल्याचा” मेसेज येत असला, तरी प्रत्यक्षात ८ ते १० दिवस सिलेंडर मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, अनेक कुटुंबांची रोजची स्वयंपाकाची व्यवस्था विस्कळीत होत आहे. विशेष म्हणजे, काही प्रकरणांमध्ये डिलिव्हरी बॉय किंवा संबंधित गॅस एजन्सीकडून नागरिकांना पुन्हा नवीन सिलेंडर बुक करण्यास सांगितले जात असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे हा प्रकार सरळसरळ फसवणूक असून न दिलेले सिलेंडर काळाबाजारात विकले जात असल्याचा गंभीर संशय व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, देशात सध्या आंतरराष्ट्रीय युद्ध परिस्थितीमुळे गॅस तुटवड्याची चर्चा असताना, दिवा शहरातील काही गॅस एजन्सींकडून नागरिकांची उघडपणे लूट सुरू असल्याचा आरोप केला जात आहे. विशेषतः भारत गॅस कंपनीशी संबंधित काही एजन्सींविरोधात मोठ्या प्रमाणात तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत.
या गंभीर प्रकाराची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रशासनाकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे. मनसेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात संबंधित एजन्सींवर चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मनसेने प्रशासनासमोर पुढील मागण्या केल्या आहेत:
१) संबंधित गॅस एजन्सींवर तात्काळ चौकशी करावी
२) दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत
३) गॅस वितरण प्रक्रियेत पारदर्शकता आणून नागरिकांना वेळेत सिलेंडर उपलब्ध करून द्यावा
तसेच, काळाबाजार करणाऱ्या एजन्सींवर तातडीने कारवाई करून त्यांचे परवाने रद्द करण्याची मागणीही करण्यात आली आहे. प्रशांत प्रभाकर गावडे, सचिव, दिवा शहर, महाराष्ट्र नवनिर्माण सेना– दिवा शहरातील नागरिकांच्या या गंभीर समस्येकडे प्रशासनाने त्वरीत लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी, अशी जोरदार मागणी मी केली आहे.
