नाशिक पोलीस आयुक्तालय राज्यात प्रथम

१५० दिवसांचा ई-प्रशासन उपक्रम

हरिभाऊ लाखे

नाशिक – राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या १५० दिवसांच्या ई गव्हर्नन्स कार्यक्रमात पोलीस आयुक्तालय गटात ‘नाशिक जिल्हा – कायद्याचा बालेकिल्ला’ उपक्रम राबविणाऱ्या नाशिक पोलीस आयुक्त कार्यालयाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. यानिमित्त मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या कार्यक्रमात पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचा गौरव करण्यात आला.

यावेळी माहिती व तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पोलीस महासंचालक सदानंद दाते आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी १५० दिवसांचा कृती आराखड्याबाबत शासकीय कार्यालयांमध्ये ई – प्रशासन सुधारणा आणण्याचे निर्देश दिले होते.

त्यानुसार राज्य शासनाच्या प्रशासनिक विभागांसाठी १५० दिवसांचा ई प्रशासन सुधारणा कार्यक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात कार्यालयाचे संकेतस्थळ, आपले सरकार प्रणाली, ई कार्यालय, कार्यालयाचा ‘डॅश बोर्ड’, ‘व्हॉटस ॲप’, ‘चॅटबॉट’, कृत्रिम बुद्धिमत्ता व ‘ब्लॉक चेन’चा वापर आणि भौगोलिक माहिती प्रणाली या सात घटकांवर सहभागी कार्यालयांचे मूल्यमापन करण्यात आले होते.

१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांनी केलेल्या कामगिरीचे अंतिम मूल्यमापन भारतीय गुणवत्ता परिषदेतर्फे करण्यात आले होते. त्यात ‘नाशिक जिल्हा- कायद्याचा बालेकिल्ला उपक्रम’ राबविणाऱ्या नाशिक पोलिस आयुक्त कार्यालयाने सर्वाधिक १५६.२५ गुण मिळवून पोलिस आयुक्तालय गटात राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली नाशिक पोलीस आयुक्तालयाने डिजिटल उपक्रम राबविले. नागरिकांशी थेट संवादाचे उपक्रम राबविले. यामध्ये ‘ई मीट वीथ सीपी’, ‘वॉक इन टूर’, नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य आदींचा समावेश आहे. यामुळे पोलिस दलाच्या कामकाजात पारदर्शकता, गतिमानता येऊन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर झाला.

या विषयी पोलीस आयुक्त संदीपकर्णिक यांनी राज्य शासनाने दिलेल्या १५० दिवसांच्या कार्यक्रमात नाशिक पोलिस दलाने प्रभावी कामगिरी बजावली. त्यामुळे राज्यात प्रथम क्रमांक मिळाला. नागरिकांच्या सुरक्षेसाठी नाशिक पोलिस आयुक्तालय सदैव तत्पर असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.

जिल्हा परिषदेचाही गौरव

ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरीबद्दल नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांचा सन्मानपत्रक देऊन गौरव करण्यात आला. १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषदांच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यात आले. सात निकषांत उत्कृष्ट कामगिरी करत नाशिक जिल्हा परिषदेने एकूण १६५.७५ गुण मिळवून राज्यात पाचवा क्रमांक मिळवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *