‘मर्मबंधातील ठेव’ कार्यक्रमातून प्रभाकर कारेकरबुवांना आदरांजली

विश्वास सामाजिक संस्थेतर्फे कार्यक्रम

ठाणे: स्वरांचा शिलेदार पंडित प्रभाकर कारेकर यांच्या गायकीतील ठुमरी, होरी, नाट्यसंगीत, अभंग, भैरवीतील नजाकतीचे स्मरण करीत पार पडलेल्या `मर्मबंधातील ठेव’ कार्यक्रमातून प्रभाकर कारेकरबुवांना प्रथम स्मृतीदिनानिमित्ताने आदरांजली वाहण्यात आली.

भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी पुढाकार घेत विश्वास सामाजिक संस्थेच्या वतीने डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात `मर्मबंधातील ठेव’ कार्यक्रमाचे शनिवारी आयोजन केले होते. प्रसिद्ध शास्त्रीय गायिका आशा खाडिलकऱ कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होत्या. साहित्य अकादमीचे सदस्य नरेंद्र पाठक, प्रसिद्ध गायक व कारेकरबुवांचे ज्येष्ठ शिष्य पंडित सुरेश बापट, अमित प्रभाकर कारेकर, संजय वाघुले, भाजपाचे महापालिकेतील गटनेते मुकेश मोकाशी, विश्वास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अमित वाघचौरे, पदाधिकारी वृषाली वाघुले-भोसले यांनी दीपप्रज्वलन केले.

पंडित सुरेश बापट यांनी `मर्मबंधातील ठेव’ या नाट्यगीताने कार्यक्रमाला सुरुवात केली. त्यानंतर `धन्य आनंद दिन’ पूर्ण हे नाट्यपद, `राम होऊनि राम गा रे’ हे भक्तीगीत, `बोलावा विठ्ठल’ हा अभंग, `या कागदी फुलांच्या’ भावगीताने मैफल रंगत गेली. प्रत्येक कलाकाराच्या गायनाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कारेकर बुवांनी स्वत:ची गायकी घडविली. सुरुवातीला त्यांचा पातळ गळा होता. मात्र, त्यांनी रियाझाने दमदार बनविला होता. एका मैफिलीसाठी अष्टपैलू व्यक्तिमत्व पु. ल.देशपांडे यांनी कारेकरबुवांना प्रिये पहा हे नाट्यपद शिकविले होते. अन्, त्या मैफिलीनंतर प्रभाकर कारेकर नावाचा उष:काल घडला, अशी आठवण निवेदिका अनघा मोडक यांनी सांगितली.

`प्रिये पहा,रात्रीचा समय सरुनी’ या नाट्यगीताने पं. सुरेश बापट यांनी मैफिलीला उंचीवर नेले. चंदनाचे परिमळ, दिनांची माऊली, गगना गंध आला, माझ्या देहाची पालखी या गीतांनी मैफल उत्तरोत्तर रंगत गेली. पंडित सुरेश बापट यांनी अजरामर झालेल्या `मै कही समझाऊं सब जग अंधा’ या भैरवीने रसिकांना मंत्रमुग्ध केलेल्या या मैफिलीचा समारोप केला.

तत्पूर्वी कारेकरबुवा व प्रसिद्ध नाटककार सतीश दुभाषी यांच्या अखेरच्या भेटीचा किस्सा पंडित सुरेश बापट यांनी सांगितला. शिवाजी मंदिर येथे झालेल्या जून १९८० मधील प्रयोगावेळी अष्टपैलू अभिनेते सतीश दुभाषी यांनी `मै केही समझाऊं’ ही भैरवी ऐकली. कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी कारेकर बुवांची भेट घेतली. पुन्हा कधी ही भैरवी ऐकेल माहित नाही, असे म्हणून दोन मिनिटे भैरवी सादर करण्याची विनंती केली. कारेकर बुवांनी सर्व वाद्यांसह संपूर्ण भैरवी सादर केली. दुर्दैवाने त्यानंतर सप्टेंबर महिन्यात सतीश दुभाषींचे अचानक निधन झाले होते. त्यावेळी एका कलाकाराने दुसऱ्या कलाकाराला दिलेली दाद आम्ही अनुभवली होती, या आठवणीने रसिक गहिवरून गेले.

पंडित सुरेश बापट यांच्याबरोबरच गायक श्रीरंग भावे, ओंकार प्रभुघाटे, केतकी भावे जोशी, गोव्यातील संदेश खेडेकर यांनी कारेकर बुवांना सांगीतिक मानवंदना दिली. नीला सोहनी, हर्षल काटदरे, सुहास चितळे, गणेश मेस्त्री, धनंजय पुराणिक आणि श्रेयस व्यास या प्रतिथयश वादकांनी समर्पक साथ दिली. तर अनघा मोडक यांनी निवेदनाची धुरा सांभाळली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *