ठाणे जिल्ह्याचा डिजिटल कायापालट

जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांचा देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव

अनिल ठाणेकर

ठाणे, महाराष्ट्रातील सर्वाधिक वेगाने नागरीकरण होणारा आणि औद्योगिकदृष्ट्या प्रगत जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे जिल्ह्याने आता डिजिटल प्रशासनाच्या क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण केला आहे. जिल्ह्याचा विस्तार आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता, शासकीय सेवा शेवटच्या घटकापर्यंत पारदर्शकपणे पोहोचविण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर होते. हे आव्हान स्वीकारून जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘ई-गव्हर्नन्स सुधारणा अभियानांतर्गत राबविलेल्या नाविण्यपूर्ण उपक्रमांमुळे ठाणे जिल्हा आज संपूर्ण राज्यासाठी एक प्रेरणादायी मॉडेल म्हणून उदयास आला आहे. या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित विशेष कार्यक्रमात ठाणे जिल्हा प्रशासनाचा विशेष गौरव करण्यात आला.

प्रशासकीय पारदर्शकता वाढविण्यासाठी डॉ.पांचाळ यांनी तंत्रज्ञानाचा वापर करीत ‘सेवा संवाद’ आणि ‘डिजी संवाद’ सारखे महत्त्वाचे उपक्रम कार्यान्वित केले आहेत. १५ ऑगस्ट २०२५ पासून सुरू झालेल्या ‘सेवा संवाद’ या उपक्रमामुळे जिल्ह्यातील ८७३ ‘आपले सरकार’ सेवा केंद्रांच्या कामकाजात मोठी शिस्त आली आहे. प्रत्येक केंद्रावर उपलब्ध असलेल्या QR-Code मुळे नागरिकांना मिळणाऱ्या सेवेचा दर्जा, सरकारी दरपत्रकाची अचूकता आणि केंद्र चालकाचे वर्तन यावर थेट ऑनलाईन अभिप्राय देण्याची सोय उपलब्ध झाली आहे. या रेटिंग प्रणालीमुळे केंद्र चालकांमध्ये जबाबदारीची भावना निर्माण झाली असून, अतिरिक्त शुल्काच्या तक्रारींवरही प्रभावी नियंत्रण आले आहे. त्याचबरोबर, नागरिकांना तक्रार निवारणासाठी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागू नयेत, यासाठी ‘डिजी संवाद’ या WhatsApp आधारित (९९३०००११८५) उपक्रमाद्वारे २४x७ तक्रार नोंदणीची सुविधा दिली गेली आहे. घरबसल्या केवळ एका मेसेजद्वारे तक्रार नोंदवणे आणि तिचे डिजिटल ट्रॅकिंग करणे शक्य झाल्याने प्रशासन खऱ्या अर्थाने गतिमान झाले आहे.केवळ दैनंदिन कामकाजातच नव्हे, तर ऐतिहासिक वारसा जतन करण्यातही जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दूरदृष्टी दाखवली आहे. ‘ई-संजीवन’ प्रणालीच्या माध्यमातून १८९० पासूनची जन्म-मृत्यू नोंदणीची जुनी ‘कोतवाल रजिस्टर्स’ आता AI आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करून सुरक्षित करण्यात आली आहेत. यामुळे शंभर वर्षांपूर्वीच्या नोंदी शोधणे आता काही सेकंदांचे काम झाले आहे. तसेच, ‘राजभूमी’ पोर्टलच्या माध्यमातून शासकीय जमिनींचे डिजिटल व्यवस्थापन सुरू करून प्रशासनाने भू-माफियांवर मोठा वचक बसवला आहे. अक्षांश-रेखांश आणि जिओ-रेफरन्सिंगमुळे सरकारी जमिनींचे अचूक क्षेत्र निश्चित झाले असून, ‘लँड बँक’ सुविधेमुळे विकास प्रकल्पांसाठी जागा निवडणे आता अधिक सुलभ झाले आहे. या पोर्टलवरील ‘Street View’ आणि विविध GIS लेयर्समुळे अतिक्रमणे शोधणे आणि जमिनींचे संरक्षण करणे सोपे झाले असून हे भू-व्यवस्थापनातील एक मोठे पाऊल मानले जात आहे.जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधांचेही डिजिटल मॅपिंग डॉ. पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाले आहे. जिल्हा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, शासकीय शाळा आणि आपत्कालीन सेवांची माहिती नकाशावर उपलब्ध केल्यामुळे सामान्य नागरिकांना या सेवा शोधणे सुलभ झाले आहे. मुख्य रस्त्यांचे जाळे आणि ड्रेनेज व्यवस्थेची डिजिटल माहिती उपलब्ध असल्याने भविष्यातील आपत्ती व्यवस्थापन आणि पूरनियोजन अधिक शास्त्रोक्त पद्धतीने करणे शक्य झाले आहे. अतिदुर्गम शहापूर-मुरबाडपासून ते गजबजलेल्या ठाणे-कल्याणपर्यंतच्या प्रत्येक नागरिकाचा वेळ, पैसा आणि श्रम वाचवण्याचे हे कार्य खरोखरच कौतुकास्पद ठरले आहे.

‘१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा’ कार्यक्रमांतर्गत राबवलेल्या या मूलभूत परिवर्तनासाठी आज एका विशेष सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ठाणे जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्यासह जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रणजीत यादव, पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त मनिषा आव्हाळे, पोलीस अधीक्षक डॉ. डी. स्वामी आणि नवी मुंबई महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांचा गौरव करण्यात आला. हा सन्मान ठाणे जिल्हा प्रशासनातील प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी आणि समस्त ठाणेकरांसाठी अभिमानास्पद असून, डॉ.पांचाळ व त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नांनी कार्यान्वित झालेल्या या डिजिटल अध्यायाने प्रशासकीय उत्तरदायित्वाचा एक नवा मापदंड प्रस्थापित केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *