जुन्या ठाणे शहराच्या विकासाचा महापालिकेला विसर : नम्रता कोळी
फेरीवाल्यांवरील दंड ५ हजार रुपये करावा
ठाणे : ठाणे महापालिकेने नव्या ठाणे शहरात विविध विकास प्रकल्प राबवितानाच, जुन्या ठाणे शहराचा विसर पडू देऊ नये, अशी सूचना भाजपच्या नगरसेविका नम्रता जयेंद्र कोळी यांनी शुक्रवारी अर्थसंकल्पीय चर्चेवेळी केली. तसेच शहराच्या विविध भागातील फेरीवाल्यांकडील साहित्य जप्त केल्यानंतर १२०० रुपयांऐवजी किमान ५ हजार रुपये दंड आकारावा, अशी मागणीही नम्रता कोळी यांनी केली.
ठाणे महापालिकेकडून नव्याने वसलेल्या ठाणे शहरात विविध प्रकल्प राबविण्यात येत आहेत. या प्रकल्पांबद्दल आनंद आहे. परंतु, नवे प्रकल्प राबविताना जुन्या शहराचा विचार करायला हवा. गायमुख, नागला बंदर, बाळकूम, कोपरी येथे खाडीकिनारी सुशोभिकरण व पर्यटन सुविधा निर्माण करण्यात आल्या. मात्र, माझ्या प्रभागातील व जुन्या ठाण्यातील महागिरी खाडी परिसराला वगळण्यात आले. या खाडीत साचलेला गाळ नालेसफाईच्या मोहिमेतून काढण्याची मागणीही पूर्ण झालेली नाही, याबद्दल नम्रता कोळी यांनी खंत व्यक्त केली. ठाणे शहराच्या विविध भागातून येणारे सांडपाणी प्रक्रियेविना थेट खाडीमध्ये सोडले जात आहे. त्यामुळे सांडपाणी प्रक्रिया केंद्र (एसटीपी) उभारावे, अशी मागणीही त्यांनी केली.
ठाणे रेल्वे स्टेशन ते कोर्ट नाका, अशोक टॉकीज ते सिडको बस स्टॉप, सिद्धिविनायक मंदिर ते तलावपाळी पर्यंतच्या रस्त्याच्या दुतर्फा फेरीवाल्यांनी ठाण मांडले आहे. त्यांच्याविरोधात महापालिकेकडून ठोस कारवाई केली जात नाही. त्यामुळे सामान्य नागरिकांना चालण्यासाठी जागा नाही. या रस्त्यावरूनच टीएमटीची वाहतूक सुरू असल्याने लाखो लोक सकाळी व सायंकाळी वाहतूक कोंडीत अडकतात. त्यामुळे या ठिकाणी कायमस्वरुपी अतिक्रमण विरोधी पथकाची जीप फिरती ठेवावी. तसेच बेकायदा फेरीवाल्यांकडून सामान व साहित्य जप्त केल्यानंतर ते सोडविण्यासाठी किमान ५ हजार रुपये दंड आकारावा, अशी मागणी नगरसेविका नम्रता कोळी यांनी केली. तसेच जुन्या स्टेशन रोडवर वाहतूककोंडी सोडविण्यासाठी १० वॉर्डनची नियुक्ती करण्याची मागणीही त्यांनी केली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारासमोरील शाळा क्र. १ बंद आहे. या शाळेच्या ठिकाणी नवी इमारत उभारून तेथे महापालिकेची सीबीएससी शाळा सुरू करावी. तसेच चरई येथील जलकुंभासाठी तरतूद करावी, अशी मागणीही नगरसेविका नम्रता कोळी यांनी केली.
