गारपीट-पाऊस -वादळी वाऱ्यामुळे सिंधुदुर्गातील आंबा -काजूचे उरले -सुरले पीकही धोक्यात…!
पाच वर्षानंतर पुन्हा एकदा तडाखा…!
राजन चव्हाण
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात नुकताच पडलेला अवकाळी पाऊस, काही भागाला बसलेला गारपिटीचा तडाखा आणि वादळी वाऱ्यामुळे आंबा आणि काजूचे उरले- सुरले पीकही आता हातचे जाणार अशी भिती व्यक्त केली जात आहे. तर काढणीला आलेल्या रब्बी पिकालाही अवकाळी पावसाचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. अचानक आलेल्या या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील आंबा – काजू बागायतदार -शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली आहे.
गेल्यावर्षी अवकाळी पाऊस आणि मान्सून वेळेअगोदर सुरू झाल्याने ‘कोकम’ या पिकाचे फार मोठे नुकसान झाले होते त्यामुळे त्याचे दरही वाढले होते यंदाही या पिकावर परिणाम होऊन दर वाढण्याची शक्यता आहे. कोकणची काळी -मैना म्हणून ओळखली जाणारे करवंदे यंदा खायला मिळतील की नाही याची शाश्वती नाही. शिवाय जांभुळ पिकावरही या अवकाळी पावसाचा परिणाम होणार आहे.
कणकवली,देवगड आणि वैभववाडी या तालुक्यांच्या अनेक भागात गारपीट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडला आणि कांही भागात तर वीजेचे खांबही कोसळले. रामनवमीच्या आदल्या दिवशी जिल्ह्यात सकाळपासूनच प्रचंड उकाडा जाणवत होता आणि रामनवमीच्या दिवशी सकाळपासून अनेक भागात अवकाळी पाऊस आणि गारपीट सुरू झाली.वैभववाडी तालुक्याच्या काही भागात तर वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आणि तालुक्यातील अनेक गावांना त्याचा तडाखा बसला.
मालवण तालुक्यातील कसाल,आंब्रड,ओसरगाव,फोंडाघाट, शिवडाव आदी ठिकाणी तब्बल अर्धा ते पाऊण तास पाऊस झाला. देवगड तालुक्यातील अनेक गावांनाही पावसाने चांगलाच तडाखा दिला. बदलत्या हवामानामुळे आधीच संकटात असलेल्या आंबा – काजू बागायतदार आणि शेतकऱ्यांची ब चिंता त्यामुळे अधिक वाढली आहे.शासकीय सर्वेक्षणानुसार बदलत्या हवामानामुळे आणि अवकाळी पावसामुळे ९० टक्के पीक वाया गेले आहे आणि आता उरले -सुरले १० टक्के पिकही हातचे जाईल अशी भिती व्यक्त केली जात आहे.
यापूर्वी १९ फेब्रुवारी २०२१ रोजी जिल्ह्यात ठिकठिकाणी गारपीट झाली होती त्यामुळे शेतकरी आणि बागायतदारांचे खूप मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर तब्बल पाच वर्षांनी पुन्हा एकदा अशाच प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीला शेतकरी- बागायतदारांना सामोरे जावे लागत आहे.
