पनवेलमध्ये २२ शाळा अनधिकृत
पनवेल – पनवेल तालुक्यामध्ये आतापर्यंत एकुण २२ शाळा अनधिकृत असल्याचे आढळून आले आहे. त्यापैकी आतापर्यंत ११ अनधिकृत शाळांवर गुन्हे दाखल झाले आहेत. अजून उलवे येथील एका शाळेवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया शिक्षण विभागाची सुरू आहे.
पनवेल तालुक्याच्या गटशिक्षण अधिकारी शाहू सतपाल यांनी पदभार स्विकारल्यापासून अनधिकृत शाळांविरोधात कठोर मोहीम हाती घेतली आहे. सतपाल यांनी पदभार स्विकारला त्यावेळेस १२ शाळा अनधिकृतपणे सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर प्रत्येक महिन्याला एक ते दोन अशा आतापर्यंत ११ अनधिकृत शाळा चालविणा-या शिक्षण संस्थाचालक, मुख्याध्यापकावर सतपाल यांनी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले.
पनवेल तालुका पोलीस ठाण्यात चार दिवसांपूर्वी (ता.२६ मार्च) शिक्षण विभागाच्या तक्रारीनंतर नेरे येथील न्यू इंग्लिश स्कूलचे संस्थाचालक, अध्यक्ष आणि मुख्याध्यापकांविरोधात हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गट शिक्षणाधिकारी सतपाल यांनी दिलेल्या तक्रारीत २०२३ पासून ही शाळा अनधिकृत चालविली जात होती. यामुळे पालक व विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या शाळेत पहिली ते आठवी या इयत्तेमधील ६९ मुले शिकत होती. पनवेल तालुक्यामध्ये अजून उलवे येथील एका अनधिकृत शाळेविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या व्यतिरीक्त तालुक्यामध्ये अजून १० शाळा अनधिकृत आहेत. गटशिक्षण अधिका-यांनी केंद्रप्रमुखांना अनधिकृत शाळेविषयी सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले होते. त्यामध्ये या १० शाळा अनधिकृत असल्याचे आढळले आहे.
