बस्तर नक्षलमुक्त – अमित शाह

नवी दिल्ली :  देशाला दीर्घकाळ सतावणाऱ्या नक्षलवादाचा पुर्णता बिमोड केला  असून त्यातून देशाची मुक्तता झाली आहे. बस्तर विभागातून नक्षलवाद पूर्णपणे संपुष्टात आला आहे, अशी घोषणा लोकसभेत ‘नक्षलमुक्त भारत’ या विषयावरील चर्चेला उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी  केली.

शाह म्हणाले की, देशातील १२ राज्ये नक्षलवादाने प्रभावित होती. डाव्या विचारसरणीमुळे या राज्यांमध्ये नक्षलवाद पसरला होता. मात्र आता बस्तर परिसरातून नक्षलवाद जवळपास संपुष्टात आला आहे. लाल दहशतीमुळे त्या भागात विकास झाला नव्हता. पण, आता बस्तरमधील प्रत्येक गावात शाळा उभारण्यात आल्या. यापुढे जो कोणी शस्त्र उचलेल, त्याला कायद्याने उत्तर दिले जाईल.

यावेळी शाहांनी विरोधकांवर आरोप केला की, त्यांना नक्षलवाद्यांची सहानुभूती आहे, पण आदिवासींच्या विकासासाठी त्यांनी काही केले नाही. नक्षलवादी विचारसरणीनुसार सत्ता बंदुकीच्या जोरावर मिळते. नक्षलवाद्यांनी आदिवासी युवकांना भडकावून त्यांना शस्त्रे दिली आणि हिंसाचाराच्या मार्गावर नेले. नक्षलवादाचा विकासाशी काहीही संबंध नाही. उलट नक्षलवादामुळे त्या भागांमध्ये विकास थांबला होता.

रेड कॉरिडॉरमध्ये नक्षलवादामुळे गरिबी वाढली. नक्षलवाद्यांनी शाळा जाळल्या, त्यामुळे आदिवासी मुलांना शिक्षण मिळू शकले नाही. 75 वर्षांत 60 वर्षे काँग्रेसचे सरकार होते, मग आदिवासी विकासापासून वंचित का राहिले? देश अनेक वर्षे नक्षलवादामुळे त्रस्त होता आणि आता नक्षलमुक्त भारताच्या दिशेने सरकार काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी विकास होत असल्याचा दावा शाहांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *