पनवेलमध्ये कराओके गीत गायन स्पर्धेची सुरेल मेजवानी
६ एप्रिलला रंगणार नवोदितांना संधी
राज भंडारी
पनवेल : गायनाची आवड असूनही योग्य व्यासपीठ न मिळालेल्या नवोदित व हौशी गायक-गायिकांसाठी एस आर कराओके स्टुडिओच्या वतीने प्रथमच “कराओके गीत गायन स्पर्धा – २०२६” चे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय मानवाधिकार सामाजिक नागरिक मंचचे रायगड जिल्हाध्यक्ष सुनील रांजणे यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा ६ एप्रिल रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत नेरे येथे होणार आहे.
ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून स्पर्धकांना वैयक्तिक (सोलो) आणि समूह (डुएट) अशा दोन गटांमध्ये सहभाग घेता येणार आहे. प्रत्येक स्पर्धकाला एक वैयक्तिक आणि एक समूह गीत सादर करण्याची संधी मिळणार आहे. स्पर्धेसाठी मराठी व हिंदी चित्रपट गीतांची निवड करण्यात आली आहे.
या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे ही स्पर्धा थेट (लाईव्ह) स्वरूपात होणार असून त्याच दिवशी परीक्षकांच्या निर्णयानुसार निकाल जाहीर केला जाणार आहे. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहणार आहे. वैयक्तिक गायनासाठी प्रथम, द्वितीय व तृतीय, तर समूह गायनासाठी प्रथम व द्वितीय क्रमांकाची पारितोषिके देण्यात येणार आहेत.
स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धकांना आकर्षक प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. इच्छुकांनी ५ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन संस्थापक सुनील रांजणे यांनी केले आहे. नोंदणीसाठी ८८५०१७५९३० व ८६९२०७६७६२ या क्रमांकांवर संपर्क साधावा. ही स्पर्धा नवोदित कलाकारांसाठी नवी संधी ठरणार असून त्यांच्या कलागुणांना योग्य दिशा देणारे व्यासपीठ मिळणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
