ज्येष्ठ कथा लेखक काशिनाथ माटल यांच्या “सावट” या कथासंग्रहाला शिवांजलीचा दुसरा पुरस्कार!
मुंबई – शिवांजली मराठी साहित्य पीठच्या विद्यमाने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा प्रौढ साहित्य सन्मान,ज्येष्ठकथा लेखक काशिनाथ माटल यांनी लिहिलेल्या “सावट” या कथासंग्रहाला(विभागून) मिळाला आहे. “सावट” या कथासंग्रहाला फेब्रुवारी महिन्यात फलटण येथील धर्मवीर छत्रपती साहित्य पुरस्कार मिळाला होता.तेथील ऍग्रोन्यूज परिवार ट्रस्टच्या वतीने मराठी भाषा दिनी हा राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आला होता. तसेच ख्यातनाम साहित्यिक नारायण सुर्वे यांच्या प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे सभागृहात नुकत्याच पार पडलेल्या साहित्य संमेलनात काशिनाथ माटल यांचा गिरणगावातील कथालेखक म्हणून स्वामीराज प्रकाशनच्या वतीने पुरस्काराने गुणगौरव करण्यात आला होता.
वरील पुरस्कार ३३ व्या राज्यस्तरीय शिवांजली मराठी साहित्य महोत्सवात प्रदान करण्यात येणार आहे. हा साहित्य सन्मान सौ. मोनिका अण्णासाहेब मटाले पुरस्कृत आणि सौ. बबनराव मटाले स्मृती प्रित्यर्थ काशिनाथ माटल त्यांच्या “सावट” आणि सोलापूरचे लेखक हरिश्चंद्र पाटील यांच्या “खरा वारस” या दोन्ही उत्कृष्ट पुस्तकांना विभागून देण्यात आला आहे. या पुरस्कारासह अन्य पुरस्कार येत्या २ मे रोजी, राष्ट्रसंत गाडगे महाराज साहित्य नगरी, पिंपळवाड,तालुका जुन्नर येथे संपन्न होणार आहे.
