पर्यावरणप्रेमींकडून अफवा पसरविण्याचे काम सुरू- आयुक्त मनिषा खत्री
हरिभाऊ लाखे
नाशिक : पर्यावरणप्रेमींनी न्यायालयात वृक्षतोडीस स्थगिती मिळविण्याचा प्रयत्न केला. परंतु, न्यायालयाने वृक्षतोडीस स्थगिती देण्यास नकार दिला. मौखिक सुनावणीतही महापालिका त्यांचे नियमित काम करीत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळेच पर्यावरणप्रेमी महापालिका पाच हजार झाडांची तोड करणार असल्याची अफवा पसरवित आहेत, असा आरोप महापालिका आयुक्त मनिषा खत्री यांनी केला आहे.
कुंभमेळ्यासाठी तपोवनातील १५०० हून अधिक झाडे तोडण्यात येणार असल्याचा मुद्दा तापलेला असतांना महापालिकेच्या वतीने शहरात ठिकठिकाणी रस्ते विस्तारीकरणात आड येणारी झाडे तोडण्यात येत आहेत. रस्त्याच्या कडेला असलेल्या जुन्या झाडांवर कुऱ्हाड चालविली जात असल्याने पर्यावरणप्रेमींकडून यास विरोध होत आहे.
काही ठिकाणी झाडांना श्रध्दांजली वाहत, चौका-चौकात सभा घेत वृक्षतोडीला विरोध दर्शविण्यात येत आहे. सोमवारी गंगापूर रोड परिसरातील काही जुन्या झाडांच्या फांद्या छाटण्याचे काम सुरू करण्यात आल्यावर याठिकाणी पर्यावरणप्रेमी दाखल झाले. त्याचवेळी वृक्षतोडीचे समर्थकही आले.
वृक्षतोडीसंदर्भात महापालिका आयुक्त खत्री यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. तपोवन असो किंवा अन्य कोणत्याही ठिकाणी पाच हजार झाडे तोडण्यासंदर्भात कुठलेही आदेश महापालिकेने दिलेले नाहीत. महापालिकेच्या वतीने रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या कामाच्या आड येणारी काही ठिकाणी १५, काही ठिकाणी १८ किंवा त्यापेक्षा जास्त झाडे तोडली गेल्याचे खत्री यांनी सांगितले.
कामाच्या व्याप्तीनुसार रस्तानिहाय ही झाडे तोडण्याची कामे सुरू आहेत. पाच हजार झाडे तोडण्याचा कोणताही आदेश, निविदा महापालिकेने काढलेली नाही. वास्तविक वृक्षतोडीबाबत पर्यावरणप्रेमी नाशिककर न्यायालयात गेले होते. त्यांनी स्थगिती आणण्याचा प्रयत्न केला. मात्र न्यायालयाने स्थगिती आणता येणार नाही, असे सांगितले.
महापालिका प्रशासन त्यांची नियमित कामे करीत आहे. न्यायालयाने वृक्षतोडीला स्थगिती मिळणार नाही, असे मौखिक सांगितल्याचेही खत्री यांनी नमूद केले. हरित लवाद प्राधिकरणच्या वतीने स्थगिती मिळणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले. या पार्श्वभूमीवर पर्यावरणप्रेमींकडून महापालिका पाच हजार झाडे तोडणार, अशी अफवा पसरवली जात आहे. असे असेल तर त्यांनी तसे लेखी आदेश दाखवावेत, असे आवाहन आयुक्त खत्री यांनी केले.
दरम्यान, महापालिकेच्या वतीने वृक्षतोडीसंदर्भात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. महापालिकेच्या वतीने वृक्षतोड होत असली तरी एक लाख नवीन झाडे लावण्यात येत आहेत. यंदा पाऊस झाला की पुढच्या वर्षासाठी झाडे लावण्याचे नियोजन सुरू आहे. कुंभमेळ्यात विकासही झाला पाहिजे आणि हरित कुंभही व्हावा, असा समतोल राखण्याच्या अनुषंगाने महापालिका काम करीत असल्याचा दावा आयुक्त खत्री यांनी केला. वृक्षतोड केवळ कुंभमेळ्याच्या कामासाठी होत नाही. काही वृक्ष रस्त्यात असल्याने अडचणी येत आहेत. याबाबत नागरिकांनी तक्रारी केल्या असल्याचे खत्री यांनी नमूद केले.
