कल्याण: भरदिवसा घर फोडून चोरीची मोठी घटना डोंबिवली पूर्व परिसरात उघडकीस आली आहे. अज्ञात चोरट्यांनी बंद फ्लॅटचे कुलूप तोडून रोख रक्कम व सोन्याचे दागिने लंपास केले. या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण आहे.
पोलिसांनी सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी वैशाली योगेशचंद्र लोहकरे (56, रा. ओम यमुना माधव बिल्डिंग, वीर सावरकर रोड, डोंबिवली पूर्व) या ४ एप्रिल रोजी सकाळी ९.१५ वाजता घराला कुलूप लावून बाहेर गेल्या होत्या. सायंकाळी ६.२०च्या सुमारास त्यांना घराचा मुख्य लोखंडी दरवाजा तुटलेला दिसला. घरात गेल्यावर चोरट्यांनी लाकडी कपाट उघडून त्यात ठेवलेले लॉकरची चावी काढून लॉकर उघडून सुमारे ३ लाख २ हजार ५०० रुपये रोख व १५ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेल्याचे दिसून आले. चोरीची एकूण किंमत सुमारे ५.०२ लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी डोंबिवली पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून आसपासचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. लवकरच आरोपींचा शोध घेतला जाईल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. चोरीच्या वाढत्या घटनांबाबत चिंता व्यक्त करत स्थानिक नागरिकांनी पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी केली आहे.
00000000
