अमरप्रेम क्रीडा मंडळ व सर्व कबड्डीप्रेमी यांच्या संयुक्त विद्यमाने

मुंबई :- वरळी कोळीवाडा येथील अमरप्रेम क्रीडा मंडळ व सर्व कबड्डीप्रेमी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच लोकप्रिय आमदार सुनील शिंदे यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली तबेला मैदान-श्रमिक जिमखाना, ना. म. जोशी मार्गचा “हिरक महोत्सवी सोहळा” रविवार, ११ एप्रिल, सायंकाळी ५ ते १० या वेळेत साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने पूर्वीचे मुंबई व आताच्या मुंबई शहरच्या सर्व वरिष्ठ पुरुष व महिला गटाच्या संघनायक व संघनायिकेंचा सन्मान करण्यात येणार आहे. मुंबई उपनगरच्या वरिष्ठ गटातील प्रथम संघनायकांना देखील यानिमित्ताने गौरविण्यात येईल. मुंबईची कबड्डी वाढविण्यासाठी ज्या संघटनानी सातत्याने स्पर्धा आयोजन केले अशा आर्य सेवा मंडळ(६१वर्ष), शिवनेरी सेवा मंडळ(५३वर्ष), अमर क्रीडा मंडळ, दादर(४३वर्ष)यांच्या बरोबरीने मातीची क्रीडांगण बनविणारे, ते क्रीडांगण एका हाती सरळ रेषेत आखणारा अशोक गुरव आदींचा सत्कार होणार आहे. महाराष्ट्रातील सर्व अर्जुन पुरस्कार प्राप्त खेळाडून बरोबर महाराष्ट्रात गेली तीन तपे वास्तवास असलेली मोनिका बाकरे(नाथ) हिला देखील निमंत्रित करण्यात आले आहे.
कबड्डी सलग चार दशकापेक्षा अधिक काळ खेळणारा विलास जाधव, बंगालला “टायगर” ही उपाधी मिळालेला वसंत सूद, ट्रॉफी बनविणारे हरीश परब, बनियान बनविणारे भुईम्बर आदी मान्यवरांचा सन्मान होणार आहे. कबड्डीच्या कठीण काळात खेळाडूंना वैद्यकीय सुविधा मिळवून देणारे हाड वैद्य, जेष्ठ पत्रकार, जेष्ठ कबड्डी समीक्षक, सर्वत्र कबड्डी पहाणारे चाहते आदी बरोबर शालेय स्तरापासुन खेळाडूंना मार्गदर्शन करणारे मार्गदर्शक आदी मान्यवारांना पाचारण करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करणारी हिंदमाता सेवा मंडळ, मुंबईत प्रथम जागतिक कबड्डी स्पर्धेचे आयोजन करणारी साऊथ कॅनरा स्पोर्टस् क्लब, कबड्डीत रोख रकमेची व मोठी पारितोषिके देणाऱ्या संघटनाचा देखील या सोहळ्यात सन्मान होणार आहे. या सोहळ्याला क्रीडा प्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या जेष्ठ्यांच्या आयुष्यात चार सुखाचे क्षण निर्माण करावेत. असे आव्हान एका परिपत्रकाद्वारे मंडळाचे अध्यक्ष राणा प्रताप तिवारी यांनी सर्व प्रसार माध्यमा द्वारे केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *