जागतिक अर्थव्यवस्थेला आता आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. होर्मुज सामुद्रधुनीमध्ये आलेल्या अडथळ्यामुळे तेलाच्या किंमती आधीच मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत आणि ऊर्जा पुरवठा विस्कळीत झाला आहे. याच सुमारास येमेनमधील इराणसमर्थित हुथी बंडखोर तांबड्या सागरात जहाजांच्या वाहतुकीविरुद्ध मोठ्या मोहिमेत सहभागी होण्याची शक्यता दिसून आली आहे. असे झाल्यास जगाला दोन सर्वात महत्त्वाच्या सागरी मार्गांवर एकाच वेळी अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे आर्थिक नुकसान बाजाराच्या अंदाजापेक्षा वाढू शकते.
अलीकडच्या काळात तेलाच्या किंमतींमध्ये अत्यंत किरकोळ चढ-उतार दिसून आले आहेत. ते आशा आणि भीती यांच्यातील संतुलन दर्शवतात. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प होर्मुज सामुद्रधुनी पुन्हा उघडल्याशिवाय इराणविरुद्ध लष्करी कारवाई थांबवण्यास तयार असू शकतात. त्यामुळे तात्काळ भीती काही प्रमाणात कमी झाली आहे. दुसऱ्या बाजूला होर्मुजमार्गे होणारा तेलपुरवठा अजूनही मोठ्या प्रमाणात विस्कळीत आहे. त्यामुळे एक गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण झाली आहे. बाजार तणाव कमी होण्याच्या अपेक्षेवर प्रतिक्रिया देत असतील; पण प्रत्यक्षात तेलपुरवठा अजूनही सामान्य झालेला नाही.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे, की किंमतींमध्ये सुधारणी होण्यासाठी होर्मुजमार्गे जहाजांची वाहतूक पूर्णपणे पूर्ववत होणे आवश्यक आहे. त्याची अद्याप कोणतीही खात्री नाही. या अस्वस्थ वातावरणात आता अडथळ्याचे आणखी एक मोठे केंद्र समोर येत आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, इराण सक्रियपणे हुथी बंडखोरांना तांबड्या समुद्रात जहाजांच्या वाहतुकीविरुद्ध नवी मोहीम सुरू करण्यासाठी प्रवृत्त करत आहे. युरोपीय अधिकाऱ्यांनी सांगितले, की हुथी बंडखोरांनी तांबड्या समुद्रातील जहाजांविरुद्ध नवीन मोहीम सुरू करण्याची तयारी करावी यासाठी इराण दबाव टाकत आहे. कारण इराण आखाती क्षेत्राबाहेरही आपला प्रभाव वाढवू इच्छित आहे.
हुथी बंडखोरांनी आधीच तणाव वाढवण्याचे संकेत दिले आहेत. प्रथमच त्यांनी इस्रायलच्या दिशेने क्षेपणास्त्रे डागली. याहूनही महत्त्वाचे म्हणजे त्यांनी इशारा दिला आहे, की ते बाब अल-मंडेब सामुद्रधुनीमार्गे जाणाऱ्या जहाजांना लक्ष्य करू शकतात. हा एक अरुंद सागरी मार्ग आहे. तो तांबड्या समुद्राला अदनच्या आखाताशी जोडतो. ही केवळ पोकळ धमकी नाही. 2023 ते 2025 दरम्यान हुथी बंडखोरांनी या भागात शंभरहून अधिक जहाजांवर हल्ले केले होते. त्यामुळे मोठ्या शिपिंग कंपन्यांना आपली जहाजे दक्षिण आफ्रिकेच्या मार्गाने वळवावी लागली. परिणामी खर्च, प्रवासाचा कालावधी आणि विमा खर्चही मोठ्या प्रमाणात वाढला. आता परिस्थिती यापेक्षा अधिक गंभीर होऊ शकते.
जागतिक ऊर्जा व्यवस्थेतील एक मोठी कमकुवत बाजू म्हणजे ती काही विशिष्ट सागरी मार्गांवर अवलंबून आहे. होर्मुज सामुद्रधुनी आणि बाब अल-मंडेब हे असेच दोन अत्यंत महत्त्वाचे मार्ग आहेत. होर्मुज आधीच अडचणीमध्ये असल्यामुळे तांबडा समुद्र हा एक महत्त्वाचा पर्यायी मार्ग बनला आहे. विशेषतः सौदी अरेबियाच्या तेल निर्यातीसाठी. सौदी अरेबियाने आपल्या पूर्व-पश्चिम पाइपलाइनद्वारे तांबड्या समुद्रातील यानबू बंदरापर्यंत तेल पाठवण्याचे प्रमाण वाढवले आहे आणि अलीकडच्या आठवड्यांमध्ये त्यात वेगाने वाढ झाली आहे; पण ही पर्यायी व्यवस्था बाब अल-मंडेबमधून सुरक्षित मार्गावर अवलंबून आहे. हुथींनी या मार्गात अडथळे आणल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात. जगातील सागरी व्यापाराचा सुमारे 15 टक्के हिस्सा या अरुंद मार्गातून जातो. तो बंद झाल्यास केवळ तेलच नव्हे, तर आशिया आणि युरोपमधील कंटेनर शिपिंगही प्रभावित होईल. त्यामुळे पुरवठा साखळीवर दबाव वाढेल. दक्षिण तांबडा समुद्र आणि बाब अल-मंडेब परिसरात जहाजांविरुद्ध हुथींची कोणतीही मोहीम जागतिक ऊर्जा बाजाराला अधिक अस्थिर करेल. आता तांबडा समुद्र हा छोटा प्रदेश राहिलेला नाही, तर जागतिक व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा बनला आहे.
भारतासाठी ही परिस्थिती गंभीर ठरू शकते. तांबडा समुद्र आणि सुएझ कालव्यामार्गे युरोपसोबत भारताचा मोठा व्यापार होतो. बाब अल-मंडेबमध्ये अडथळा निर्माण झाल्यास भारतीय व्यापाऱ्यांना आपला माल आफ्रिकेच्या मार्गाने पाठवावा लागेल. त्यामुळे प्रवासाचा वेळ वाढेलच, शिवाय खर्चही वाढेल. ऊर्जाक्षेत्रावर याचा अधिक खोलवर परिणाम होईल. भारत कच्च्या तेलाच्या आयातीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे.
होर्मुजमधील अडथळ्यामुळे तांबडा समुद्र मार्ग अधिक महत्त्वाचा बनला आहे. तोही अडचणीत आल्यास तेलपुरवठा आणखी कमी होईल आणि किंमती वाढतील. तेलाच्या वाढत्या किंमतींमुळे महागाई वाढेल, चालू खात्याचा तुटवडा वाढेल आणि रुपयावर दबाव येईल. रिफायनिंग, विमानवाहतूक आणि लॉजिस्टिक्स यांसारख्या क्षेत्रांवर थेट परिणाम होईल. महागड्या वाहतुकीमुळे निर्यातही प्रभावित होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *